जळगावच्या गणेशोत्सवाचे बदलते रुप

0
29

जळगावातील गणेशोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात केवळ लहान गणेशमुर्तींची स्थापना केली जात असे.आरास किंवा देखाव्याचा थांगपत्ता नव्हता.त्यानंतर सत्तर-ऐंशीच्या दशकात धार्मिक आरासांना प्राधान्य देण्यात आले.नंतर धार्मिक देखाव्यांबरोबर सामाजिक व जनजागृतीपर देखाव्यांनाही भक्तांची पसंती मिळू लागली. काळाच्या ओघात आता गणेश मंडळांची सुत्रे नव्या पिढीकडे आली आहेत.त्यामुळे गणेशोत्सवात अत्याधुनिकीकरणाची जोड मिळाल्याचे दिसत आहे.जनजागृतीवर भर देण्यात येत असून विविध उपक्रम राबविले जात आहे.सामाजिक संस्थांचाही सहभाग वाढल्याचे दिसत आहे.

देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे.विशेषतः महाराष्ट्रात या उत्सावाला उधाण येते.राज्यातील प्रमुख शहरांसह जळगाव शहरातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याची परंपरा सुरु आहे.गेल्या पन्नास वर्षापासूनचे गणेशोत्सव जवळून बघण्याचा योग मला आला.त्यामुळे या उत्सवाचे शहरातील बदलते स्वरुपही अनुभवास आले.साठच्या दशकात शहराची सीमा मर्यादित होती.गोपाळपूरा,जुने जळगाव, रथचौक, सुभाषचौक, बालाजी मंदिर व नगरपालिका इमारत एवढा प्रमुख भाग समाविष्ट होता. त्याकाळात गणेशोत्सवाचे स्वरुपही मर्यादित होते.लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरु केला त्यादृष्टीन मोजक्या १०-१२ ठिकाणी सार्वजनिक स्वरुपात पण गणेशाच्या लहान मूर्त्यांची प्रतिष्ठापना केली जात होती.त्यावेळी आजच्या सारखा गाजावाजा किंवा अपेक्षीत उत्साह नव्हता.सत्तरच्या दशकात शहरातील गणेशोत्सवाचे स्वरुप पाहता गणेश मंडळे ‘श्रीं’च्या मूर्तीपेक्षा देखाव्यांवर भर देत होते.विशेषतः धार्मिक आरासांवर भर दिला जात असे.याशिवाय शहरातील गणेशोत्सवाचे मुख्य केंद्र होते ते पांजरापोळ चौक,रथचौक,मारोती पेठ,सराफ बाजार व सुभाष चौक असे होते.तरुण कुढापा,श्रीराम गणेश मंडळ,जिद्दी गणेश मंडळ,श्री साईनाथ गणेश मंडळ,मारोती पेठ मित्र मंडळ,बालाजी गणेश मंडळ,सराफ बाजार मित्र मंडळ,सुभाष चौक गणेश मंडळ या मंडळांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता.त्यातील श्री साईनाथ मित्र मंडळाचा देखावा हे मुख्य आकर्षण ठरले होते.सत्यवान सावित्री ही त्यांची गाजलेली आरास आजही अनेकांच्या स्मरणात घर करुन राहिली आहे.गणेशभक्तांची आरास बघण्यासाठी या परिसरात झुंबड उडत असे.या परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त होत होते.विशेष म्हणजे त्याकाळी शहरातील नागरिकांबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनताही मिळेल त्या वाहनाने शहरात गणेश मंडळांनी साकारलेली आरास बघण्यासाठी येत असे.अलिकडच्या काळात हे प्रमाण आता कमी झाल्याचे दिसते.

काळाच्या ओघात ऐंशीच्या दशकात यात आणखी भर पडत गेली.वाल्मिक नगरात वाल्मिकी मित्र मंडळ व महर्षि वाल्मिक तरुण सांस्कृतिक मंडळ,शनीपेठेत शनीपेठ मित्र मंडळ,बळीराम पेठेत आझाद मित्र मंडळ व एकता मित्र मंडळ तसेच नगरपालिका मित्र मंडळांचा समावेश झाल्याने गणेशोत्सवाची हद्दही वाढत गेली,त्याचबरोबर विस्तारही होत गेला.हळूहळू शहरातील गणेशोत्सव पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे सरकत जाऊ लागला.त्यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन गणेश मंडळ, शिवाजीनगर मित्र मंडळ, नवीपेठ मित्र मंडळ,जेडीसीसी बँक कर्मचारी मित्र मंडळ,शिवा मित्र मंडळ,स्टेशन रोड मित्र मंडळांचा सहभाग वाढला.काही कालावधीतच नेहरु चौक मित्र मंडळ,विसनजी नगर मित्र मंडळ,जयकिसनवाडी मित्र मंडळ,जिल्हापेठ मित्र मंडळासह अनेक मंडळांचा समावेश झाल्याने या उत्सवाला उधाण येऊ लागले.

सामाजिक विषयांवर देखावे

जळगावातील गणेशोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात केवळ लहान गणेशमुर्तींची स्थापना केली जात असे.आरास किंवा देखाव्याचा थांगपत्ता नव्हता.त्यानंतर सत्तर-ऐंशीच्या दशकात धार्मिक आरासांना प्राधान्य देण्यात आले.नंतर धार्मिक देखाव्यांबरोबर सामाजिक व जनजागृतीपर देखाव्यांनाही भक्तांची पसंती मिळू लागली.बळीराम पेठेतील एकता मित्र मंडळाने त्याकाळी केलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावलाच झाले पाहिजे,दारुबंदी,भ्रष्टाचाररुपी दहीहंडी कोण फोडणार हे देखावे तसेच आझाद मित्र मंडळाने साकारलेली अंध-अपंगाच्या जीवनावरील ‘जानेवालो जरा,मुडके देखो मुझे’ या आराससह जळगावचा श्रीराम रथोत्सव व हिंदु-मुस्लीम एकतेचे दर्शन हा देखावाही त्याकाळी खूप गाजला होता.

उभे केले प्रति पंढरपूर

सराफ बाजारातील श्री साईनाथ मित्र मंडळाचा देखावा पाहण्यासाठी भक्तांची झुंबड उडत असे.सत्यवान सावित्री,अमृत मंथन,पुतना मावशीचा वध,सीता वस्त्रहरण, ह्या आरास गणेशभक्तांना आवडल्या.या मंडळाने प्रति पंढरपूर उभारण्याचा निर्णय घेतला.सराफ बाजारातील जागा अपूर्ण पडेल म्हणून शहरातील जळगाव मार्केट कमेटीचे मैदान (सध्याचे गोलाणी माकेट)घेण्यात आले.त्याठिकाणी भव्यदिव्य प्रति पंढरपूर उभारण्यात आले.दर्शनासाठी अलोट गर्दी उलटली.विशेष म्हणजे जिल्ह्यातून लाखो भक्तगण आल्याने या परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.माऊलीचे दर्शन घेतल्यावर भक्तांना धन्य झाल्यासारखे वाटायचे.त्यांंच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद दिसत होता.

प्रतिकृती उभारण्याची परंपरा

साईनाथ मित्र मंडळाच्या या उपक्रमानंतर जळगाव शहरात प्रतिकृती उभारण्याची प्रथा गणेशोत्सवात सुरु झाली.नवीपेठ मित्र मंडळ,शिवा गणेश मंडळ,नेहरु चौक गणेश मंडळ,जिल्हापेठ मित्र मंडळ,बळीराम पेठेतील आझाद सांस्कृतिक मित्र मंडळासह काही मंडळांनी देशातील प्रसिध्द धार्मिक मंदिरांची प्रतिकृती उभारण्याची परंपरा सुरु केली,ती आजही सुरु आहे.

मंडळांच्या संख्येत वाढ

जळगाव शहरात सत्तरच्या दशकात काही मोजकेच सार्वजनिक गणेश मंडळे कार्यरत होती.जसजसा शहराचा विस्तार होत गेला तसतशी गणेश मंडळांच्या संख्येतही भर पडत गेली.त्याकाळी उत्सवाला प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींंमध्ये पंडीतराव कोल्हे,मेजर यशवंत सोमा,वामनराव खडके,राजारामबापू,गजानन जोशी,दापोरेकर परिवार,केशवराव भोईटे,आनंदराव महाजन,कोडिंबा कोकाटे, श्यामराव काळे, नरेंद्र चंदनकर,अंकुश जगताप,प्रा.चंद्रकांत सोनवणे,श्याम कोगटा,प्रा.नारायण खडके आदींचा समावेश करावा लागेल.काळाच्या ओघात आता गणेश मंडळांची सुत्रे नव्या पिढीकडे आली आहेत.त्यामुळे गणेशोत्सवात अत्याधुनिकीकरणाची जोड मिळाल्याचे दिसत आहे.जनजागृतीवर भर देण्यात येत असून विविध उपक्रम राबविले जात आहे.सामाजिक संस्थांचाही सहभाग वाढल्याचे दिसत आहे.गणेशोत्सवात प्रारंभी किर्तने,भजन असे कार्यक्रम होत असे.त्यानंतर पडद्यावर चित्रपट दाखवण्यावर भर देण्यात आला.नंतरच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची लाट आली.अलिकडच्या काळात कार्यक्रम पडद्याआड गेले असून आता भव्यदिव्य देखाव्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.याशिवाय गणेशभक्तांसाठी भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

श्री विसर्जन मिरवणूक

गणरायाची दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने पूजा केल्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळे प्रारंभी आपल्या आवडीनुसार मेहरुण तलाव,गिरणा नदी,तापी नदी पात्रात ‘श्रीं’ चे विर्सजन करीत असे.नंतर हळूहळू सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी एकत्र येऊ लागले आणि शहरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूकीची प्रथा सुरु झाली.सुरुवातीला या मिरवणुकीत मोजकेच मंडळे सहभागी होत असे.मेहरुण तलावावर विसर्जन करण्यात येऊ लागले.मानाचा गणपती म्हणून नगरपालिकेचा गणपती अग्रभागी असण्याची प्रथा प्रारंभापासून सुरु आहे,ती आजही कायम आहे.काळाच्या ओघात विर्सजन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळांंचा सहभाग वाढत गेला.त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे व त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्नशिल आहेत. एकेकाळी सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत आठ-दहा मंडळ सहभाग घेत होते मात्र ही संख्या वाढत गेली आणि आज जवळजवळ ५० गणेश मंडळांचा सहभाग असतो आणि बहुतेक मंडळे विसर्जन मिरवणुकीतही देखावे सादर करतात तसेच ढोल व लेझीम पथकांचे सादरीकरण करतात.त्यामुळे विसर्जन मिरवणूकीचा आनंद लुटण्यासाठी गणेशभक्तांची एकच झुंबड उडत असते.नेहरुचौक ते भिलपूरा चौकापर्यंत उत्साहाला उधाण येते.भिलपूरा मशिदीजवळील लालशा बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरु आहे त्यातून धार्मिक सलोख्याची भावना जोपासली जात आहे.

सार्वजनिक श्री विसर्जन मिरवणूकीची सुरुवात पूर्वी जुन्या नगरपालिकेपासून दुपारी २ वाजता होत असे.आता महानगरपालिकेपासून सकाळी ११ वाजता प्रारंभ होत असला तरी मिरवणुकीत सहभाग घेणाऱ्या मंडळांची रांंग शिवतीर्थ मैदानापासून लागतांना दिसते.शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन सार्वजनिक विसर्जन मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरु करण्यात येते व तिचा समारोप मध्यरात्रीनंतर मेहरुण तलावावर गणरायाला निरोप देऊन तितक्याच उत्साहात होत आहे.

जुने जळगावातील गणेशोत्सव

यासंदर्भात जुने जळगावात फेरफटका मारला असता,यंदा जुने जळगावसह रथचौक,सुभाषचौकपर्यंतच्या मंडळांमध्ये श्रींच्या उंचच उंच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात जणुकाही स्पर्धा लागल्याचे दिसून आले.जुने जळगावातील गणेशोत्सवाबाबत ज्येष्ठ नागरिक वसंतराव खडके म्हणाले की,साठच्या दशकात जुने जळगाव परिसरात १० ते १२ छोटी मंडळे होती व ते लहानमूर्त्यांची प्रतिष्ठापना करीत होते.त्याकाळी कोणतेही कार्यक्रम होत नसे.यशवंत कोल्हे म्हणाले की,लोकमान्य टिळकांनी जनजागृती व लोकांनी एकत्र यावे म्हणून हा उत्सव सुरु केला.तोच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन गणेशोत्सव साध्यापध्दतीने साजरा केला जात होता.आजसारखा धुमधडाका नव्हता.त्याकाळी आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती तसेच शेतीमध्येही उत्पन्न फारसे मिळत नव्हते.

‘श्री साईनाथ’च्या आठवणी आजही ताज्या

सराफ बाजारातील एकेकाळी गाजलेल्या श्री साईनाथ मित्र मंडळाचे आज अस्तित्व नसले तरी त्या मंडळाच्या आठवणी आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत.सराफ बाजारात फेरफटका मारला असता त्याचा प्रत्यय येतो. तुळशीदास बाविस्कर (दापोरेकर), मुकुंदा यादव (दापोरेकर), अंबुराव कासार आदींनी सुरु केलेल्या श्री साईनाथ गणेश मंडळाने अनेक वर्ष गणेशभक्तांच्या ह्दयावर राज्य केले.या मंडळाने सादर केलेले सत्यवान सावित्री,प्रति पंढरपूर,स्वामी समर्थ वटवृक्ष,संत तुकारामांची वैकुंठ भेट हे देखावे खूपच गाजले.प्रति पंढरपूर देखाव्यातील विठ्ठलाची मनमोहक मूर्ति दर्शनार्थ अनेक वर्ष सराफ बाजारात स्थापित करण्यात आली होती. तिचे स्थलांतर आता पांडे डेअरी चौकातील दापोरेकर मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.

– हेमंत काळुंखे
ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
मो.९८८१७ ५४५४३

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here