कोलंबो ः वृत्तसंस्था
आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. वास्तविक, बांगलादेशविरुद्धच्या सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात ४२ धावांची उत्कृष्ट खेळी करणारा अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना अक्षरला दुखापत झाली होती, मात्र आता अक्षर अंतिम सामन्यासाठी संघासोबत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला कोलंबोला बोलावण्यात आले आहे त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, २३ वर्षीय वॉशिंग्टन सुंदर रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. अक्षर पटेलचा बदली खेळाडू म्हणून सुंदरला कोलंबोला बोलावण्यात आले आहे. वॉशिंग्टन सुंदर हा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाचा एक भाग आहे. त्यामुळे सध्या तो बंगळुरूमधील एनसीएमध्ये सराव करत आहे.आशिया कप फायनलनंतर सुंदर पुन्हा बंगळुरूला पोहोचेल. चीनमध्ये २३ सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरूवात होणार आहे मात्र, वॉशिंग्टन सुंदर श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग बनतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
अक्षर पटेल हा देखील विश्वचषक संघाचा एक भाग आहे. सध्या त्याच्या दुखापतीबद्दल फारशी माहिती नाही, पण दुखापत गंभीर असेल तर त्याला विश्वचषकाला मुकावे लागू शकते आणि अशा स्थितीत वॉशिंग्टन सुंदर विश्वचषक संघाचा भाग बनू शकतो. अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला जाऊ शकते कारण तो ऑफब्रेक गोलंदाजीसोबतच डावखुरा फलंदाज आहे.वॉशिंग्टनने या वर्षी जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा वनडे खेळला होता.
दरम्यान, अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षर पटेलची आशिया चषकसाठी संघात निवड करण्यात आली होती व त्याने ती निवड सार्थ देखील ठरवली. मधल्या फळीत त्याने भारतीय संघासाठी चांगले योगदान दिले. त्यामुळे त्याची उणीव आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात जाणवणार
आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतही सहभाग
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. वॉशिंग्टन सुंदर हा या भारतीय संघाचा एक भाग आहे. आशिया कप फायनलनंतर वॉशिंग्टन सुंदर थेट आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होईल, असे मानले जात आहे.
