रावेर ः प्रतिनिधी
राज्यात कांँग्रेस पक्षाच्यावतीने सदभावना रॅली काढण्यात येत आहे.अशीच एक रॅली रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांंच्या मतदारसंघात मंगळवारी काढण्यात आली. या रॅलीत धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाचे एनएसयूआयचे विद्यार्थी बाईक रॅलीत सहभागी झाले होते.त्याच रॅलीत सहभागी झालेला विद्यार्थी भुवनेश दालुराम कुमावत (वय १९) याचा अपघाती मृत्यू झाला.त्यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,रॅलीच्या आयोजकांनी अपघाताची घटना घडल्यानंंतर तत्काळ न कळवल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेची माहिती साडेचार वाजता पोलिसांमार्फत पालकांना कळते त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, मंगळवारी खिरोदा ते सावदा अशी कांँग्रेस पक्षाच्यावतीने सदभावना रॅली काढण्यात आली होती. कांँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अन्य नेते उपस्थित होते.बाईक रॅलीत धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाचे एनएसयूआयचे विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यात भुवनेश देखील सहभागी होता. त्याच्या सोबत एक सहकारी मित्र मागे बसलेला होता.भुवनेश हा रॅलीच्या मागे होता.कोचूर गावाजवळ असलेल्या एका वळणावर त्याच्या मोटारसायकलला समोरून येणाऱ्या वाहनाने टक्कर दिली.त्यात भुवनेश खाली पडला आणि डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.याबाबत फैजपूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
संवेदना हरवलेले आमदार आणि काँग्रेस नेते
आमदार शिरीष चौधरी यांच्या मतदार संघात ही रॅली होती.त्यात बाळासाहेब थोरात आणि नेते सहभागी झाले होते.या रॅलीत आमदार आणि माजी शिक्षण मंत्र्यांच्या महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूची गंभीर घटना घडली.अनेकदा स्वतःचा वाढदिवस,पक्ष कार्यक्रम यातून समाजसेवेचा ढिंडोरा पिटणाऱ्यांच्या भावना अत्यंत बोथट झाल्याचे पहायला मिळाले. ही घटना जेवढ्या गांभीर्याने घ्यायला हवी होती,तेवढी ती घेतली नाही.केवळ आयोजकांच्या हलगर्जीपणामुळे अपघात आणि सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.
माझ्या मुलाला न्याय मिळावा – पालक दालुराम
या अपघातात मृत्यू पावलेला विद्यार्थी भुवनेश दालुराम कुमावत हा केऱ्हाळे (भोकरी ता. रावेर) येथे आपल्या पालकांसह राहतो. तथापि, तो मूळचा राजस्थानी रहिवाशी आहे. त्यामुळे शवविच्छेदनानंंतर त्याचे पार्थिव राजस्थान येथे त्यांच्या गावी नेण्यात आले.तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत मुलाचे वडील दालुराम यांंनी सांगितले की, दुपारी अपघात झाला, पण आम्हाला कोणीच कळविले नाही. चार वाजेला पोलिसांचा फोन आला तेव्हा कळले. माझ्या मुलाचा मृत्यू हलगर्जीपणामुळे झाला आहे. मी बारा दिवसानंतर येणार आहे.माझ्या मुलाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा करीत आहे.