रावेर : प्रतिनिधी
गुरुवारी वादळी पावसाने तालुक्यातील तापी पट्ट्याला तडाखा दिल्यावर शुक्रवारी लोकप्रतिनिधी शेतकर्यांचे व नुकसानग्रस्तांचे आसू पुसण्यासाठी थेट बांधावर पोहचले. माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे, व मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदार उषाराणी देवगुणे, श्वेता संचेती यांनी नुकसानग्रस्तांच्या घरांची व शेती शिवारात जाऊन केली बागांची नुकसानीची पाहणी केली.
१५० कोटींच्या नुकसानीचा अंदाज
रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील केळीचे सुमारे १५० कोटींच्या नुकसानीचा अंदाज ज्येष्ठ केळी तज्ञ के.बी. पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी केली.
सर्व नुकसानीचे पंचनामे करा – खा. रक्षाताई खडसे
खासदार रक्षाताई खडसे यांनी निंभोरासीम, विटवा, निंबोल, ऐनपूर, धामोडी, खिर्डी, कोळदा, अहिरवाडी या ठिकाणी भेटी दिल्या. त्यावेळी सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर ,जि . प सदस्य नंदकिशोर महाजन, कृउबा संचालक श्रीकांत महाजन, पं.स.सदस्य जितू पाटील, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, संदीप सावळे, भाजप युवा अध्यक्ष महेंद्र पाटील, पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. कोळदा येथे स्त्रियांनी रडून आपली कैफियत मांडली.
पीकविम्याचे निकष शिथिल करा – माजी मंत्री खडसे
काही गावांमध्ये केळीच्या बागा पूर्ण भुईसपाट झाल्या आहेत. केळी ही खर्चिक पीक असून त्यासाठी फळपीक विमा योजना राबवली गेली. परंतु विम्याचे निकष बदलविण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्यांना विम्याचा मिळावा यासाठी निकष शिथिल करावेत अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली असून यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी नुकसानीच्या पाहणीवेळी शेतकर्यांना दिले. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, माजी जि प सदस्य रमेश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, रावेर शहराध्यक्ष महेमुद शेख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे उपस्थित होते.
पंचनामे होताच भरपाई – आ. पाटील
रावेर व मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये केळीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना रायगड जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळात दिलेली भरपाईप्रमाणे आर्थिक मदत द्यावी. पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले.शासन शेतकर्यांच्या पाठीशी असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. छोटू पाटील, निळू पाटील, राहुल पाटील, दिलीप पाटील, वसंत पाटील, नारायण पाटील उपस्थित होते.