पेगुला, जाबेऊर स्पर्धेबाहेर; पुरुषांत अल्कराझ, मेदवेदेव उपांत्यपूर्व फेरीत

0
15

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला गटात सलग दुसऱ्या दिवशी नामांकित खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्या इगा श्वीऑनटेकपाठोपाठ अमेरिकेची तिसरी मानांकित जेसिका पेगुला व विम्बल्डन उपविजेत्या पाचव्या मानांकित टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याच वेळी पुरुषांत अग्रमानांकित कार्लोस अल्कराझ, तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली.
महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या मॅडीसन कीजने आपल्याच देशाच्या पेगुलाला ६-१, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. कीजचा सामना चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोड्रोउसोव्हाशी होणार आहे. मार्केटाने अमेरिकेच्या पेटन स्टर्न्सला ६-७ (३-७), ६-३, ६-२ असे नमवले. दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काने दारिया कसात्किनावर ६-१, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय साकारला. तिचा सामना चीनच्या किनवेन झेंगशी होणार आहे. झेंगने जाबेऊरला ६-२, ६-४ असे पराभूत करत धक्कादायक निकाल नोंदवला.
पुरुष एकेरीत विम्बल्डन विजेत्या अल्कराझने बिगरमानांकित इटलीच्या माट्टेओ अर्नाल्डीला ६-३, ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या अल्कराझने अर्नाल्डीला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. पुढच्या फेरीत त्याच्यासमोर जर्मनीच्या ॲलेक्झांडर झ्वेरेव्हचे आव्हान असणार आहे. १२व्या मानांकित झ्वेरेव्हने इटलीच्या सहाव्या मानांकित यानिक सिन्नेरचा ६-४, ३-६, ६-२, ४-६, ६-३ असा पराभव केला. अन्य उपउपांत्यपूर्व सामन्यात मेदवेदेवने ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स डी मिनाऊरवर २-६, ६-४, ६-१, ६-२ असा विजय नोंदवला. त्याची गाठ आपल्याच देशाच्या आंद्रे रुब्लेव्हशी पडेल. रुब्लेव्हने ब्रिटनच्या जॅक ड्रॅपरला ६-३, ३-६, ६-३, ६-४ असे पराभूत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here