जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात आढळून येणार्या म्युकर मासकोसीसच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणारी साधनसामुग्री व औषधे जिल्ह्यातच उपलब्ध करुन देण्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करुन देण्यात येईल. असे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील म्युकर मासकोसीस वॉर्डास आज भेट देऊन तेथील पाहणी केली तसेच रुग्णांशीही संवाद साधला. त्यांनतर झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा रुग्णालयाचे प्रशासन डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेसह महाविद्यालय व सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्युकर मायकोसीस आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून याठिकाणी ५० खाटा ठेवण्यात आल्या आहेत. सद्यपरिस्थितीत याठिकाणी १५ रुग्ण उपचार घेत असून पैकी २ रुग्णांवर आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रुग्णांवर करण्यात येणार्या शस्त्रक्रिया या अतिशय किचकट आणि जोखमीच्या असतात. यासाठी लागणारी साधनसामुग्री महाविद्यालयात उपलब्ध असणे आवश्यक असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी यावेळी दिली असता यासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल.
याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.
त्याचबरोबर जिल्ह्यातील म्युकर मासकोसीसच्या कोणत्याही रुग्णांस उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही याची दक्षात प्रशासनाने घ्यावी. आवश्यक त्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.