बुद्ध विचारांचे सौंदर्य आणि सुगंध अप्रतिम आहे – भन्ते विनय बोधीप्रिय

0
66

जळगाव : प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सूक्ष्म दृष्टीने बुद्ध स्विकारला, बुद्ध आकाराने, बाह्य सौंदर्याने सुंदर नाही तर अंतरिक सौंदर्याने सुंदर आहे. बुद्ध विचारांचे सौंदर्य आणि सुगंध अप्रतिम आहे. असे प्रतिपादन भन्ते विनय बोधीप्रिय यांनी केले. फुलेशाहू-आंबेडकर विचारमंच, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अजिंठा हौसिंग सोसायटी व फुलेशाहू-आंबेडकर उत्सव समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीच्या निमित्ताने ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विचार मांडतांना भन्ते विनय बोधीप्रिय बोलत होते.
भन्ते विनय बोधीप्रिय म्हणाले की, भगवान तथागताने अंतरिक सौंदर्य वाढविण्यास सांगितले आपण मात्र बाह्य सौंदर्य वाढविण्यावर भर देतो. हे बाह्य सौंदर्य नष्ट होणारे असते. धम्माचे भारतातील विद्यमान अस्तित्व विशद करतांना भन्ते विनय बोधीप्रिय म्हणाले भारतीय माणूस खाण्या – पिण्यात, कपड्या लत्यात, दाग – दागिन्यात, पैसा व्यर्थ खर्च करतो त्यामुळे त्याचे दान कार्य दबलेले आहे. तर भारतीय माणसांच्या तुलनेत परदेशी लोक भौतिक सुखाला त्यागून मोठ्या प्रमाणात दान करतात.दानाला महत्त्व देतात.इतर बौध्द राष्ट्रांनी त्यांच्या देशात बौध गयेच्या प्रतिकृती तयार केल्या व भारतात जन्माला आलेल्या बौध्द धम्मास मोठ्या प्रमाणात स्विकारले.बौध्द संस्कृती रूजवण्याचा व प्रामाणिकपणे बौध्द तत्वज्ञान अंगिकारण्याचा प्रयत्न करतात मात्र भारतीय माणूस बौध्द धम्माची कुठलीही कर्तव्य न पार पाडता भिक्खूच्या उणिवा शोधण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतो.
पुढे बोलतांना भन्ते विनय बोधीप्रिय म्हणाले की, पुस्तक वाचून धम्माचा अनुभव घेता येत नाही तर स्वतः कृतीशील राहून अनुभव घ्यावा लागतो.जेव्हा कर्तव्य केले जाते तेव्हाच बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो आपल्याकडे लोक कर्तव्य न करता केवळ बोलत असतात.बुद्ध विहार ही संस्कृती आहे ती इमारत नाही,त्या त्या देशातील संस्कृती नुसार बौध्द विहारांची निर्मिती झाली आहे.
बुद्ध जयंतीच्या निमित्ताने या दोन दिवशीय जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरातील विविध संघटना, विचारमंच, समित्या या सर्वांनी एकत्र येवून फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक, विचारवंत प्रा.म.सु.पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुराव वाघ यांनी केले. तर आभार सुबोध वाकोडे यांनी मानले.हा दोन दिवशीय महोत्सव यशस्वी करण्यासाठी अरूण अवसरमल,डॉ. विजय घोरपडे, दीपक खरात, शांताराम तायडे,ताराचंद अहिरे,ऊगलाल शिंदे,कृष्णा संदानशिव, महेश सुर्यवंशी यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here