भारतीय वंशाच्या तन्वीर संघाचे ऑस्ट्रेलियासाठी झोकात पदार्पण

0
11

मेलबोर्न : वृत्तसंस्था

भारतीय वंशाचा लेगस्पिनर तन्वीर संघाने बुधवारी ऑस्ट्रेलियासाठी दमदार ट्व्‌ोन्टी२० पदार्पण केलं. पदार्पणातच ४ विकेट्‌‍स घेत तन्वीर राष्ट्रीय संघातली निवड सार्थ ठरवली. ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. मिचेल मार्शच्या नव्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्व्‌ोन्टी२० सामन्यात चार नवोदितांना संधी दिली. त्यामध्ये तन्वीरचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी एक्सटेन्डेड संघाची घोषणा केली होती. त्यामध्येही तन्वीरच्या नावाचा समावेश होता.
तन्वीरआधी भारतीय वंशाचा गुरिंदर संधू ऑस्ट्रेलियाच्याच पुरुष संघासाठी खेळला होता. दिग्गज महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकेर यांनीही प्रदीर्घ काळ ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जेसन संघा, अर्जुन नायर यांच्यासह दक्षिण आशियाई पार्श्वभूमी असणारे खेळाडू खेळत आहेत.
पंजाबमधल्या जालंधर जिल्ह्यातलं रहीमपूर हे तन्वीरचे वडील जोगा संघा यांचं मूळ गाव. १९९७ मध्ये स्टुडंट व्हिसावर जोगा ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. तिथे त्यांनी सिडनीतल्या ‘चेंबर्स स्कूल ऑफ बिझनेस’ इथे प्रवेश घेतला. पण वर्षभरातच त्यांनी तो अभ्यासक्रम सोडला. घरभाडं, अभ्यासक्रमाची फी या सगळ्यासाठी पैसे लागायचे. त्याकरता जोगा यांनी टॅक्सी चालवली. नंतर काही काळ ट्रकही चालवला. यादरम्यान त्यांनी वंशवादाचाही सामना केला. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना जोगा यांनी यासंदर्भात सविस्तरपणे सांगितलं. आता ते सिडनीत ॲल्युमिनियम दरवाजे आणि खिडक्यांचं काम करतात. तन्वीरच्या क्रिकेट कारकीर्दीत स्वत: व्हॉलीबॉलपटू राहिलेल्या जोगा यांची भूमिका मोलाची आहे. जोगा स्वत: कबड्डी, कुस्तीही खेळायचे.
२०२० मध्ये झालेल्या U१९ वर्ल्डकप स्पर्धेत तन्वीरने ६ सामन्यात १५ विकेट्‌‍स पटकावत छाप उमटवली. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियातील बिग बॅश ट्व्‌ोन्टी२० लीग स्पर्धेत तन्वीरने १६.६६च्या सरासरीने २१ विकेट्‌‍स घेतल्या. या चांगल्या कामगिरीसाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने तन्वीरचं कौतुक केलं. ऑस्ट्रेलियाचे निवडसमिती अध्यक्ष जॉर्ज बेली यांनीही तन्वीरच्या खेळाचं कौतुक केलं. तन्वीरला कारकीर्दीत अगदी सुरुवातीला दुखापतींचा सामना करावा लागला. जवळपास वर्षभर तो खेळू शकला नाही. पण दुखापतीतून परतल्यानंतर त्याने दिमाखात पुनरागमन केलं. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने तन्वीरला शाबासकी दिली आहे.
भारतात चेन्नई इथे एमआरएफ अकादमीत ऑस्ट्रेलियातील युवा खेळाडूंचा एक चमू आला होता. तन्वीरचा त्यात समावेश होता. भारताचा आघाडी लेगस्पिनर युझवेंद्र चहल याची गोलंदाजी तन्वीरला प्रचंड आवडते. चहलच्या बरोबरीने गोलंदाजी करण्याचं त्याचं स्वप्न आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here