पहूर ता. जामनेर : वार्ताहर
राज्यभर तसेच जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनारुग्ण या आजाराने त्रस्त झाले आहेत. पहूरमधील एक तरुण मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहे. या आजाराचा वाढता धोका लक्षात घेता येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी जिल्ह्यातील पहिले म्युकरमायकोसिस रोगनिदान शिबिर जीएम फाउंडेशन व आर्या फाउंडेशनने आयोजित केले होते.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे होते. पहूर ग्रामीण रुग्णालयात घेतलेल्या या शिबिरात जवळपास ५० रुग्णांची तपासणी नेत्र रोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केली. या वेळी त्यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करुन काळजी घेण्याचे आवाहन केले. दर सोमवारी व शुक्रवारी नियमित तपासणी करण्यात येणार असून गरज पडल्यास संशयित रुग्णांची सिटीस्कॅन पीएनएस आमदार गिरीश महाजन यांच्यातर्फे विनामूल्य करण्यात येणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले. या वेळी पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, डॉ. संदीप कुमावत, डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. योगेश ढाकरे, डॉ. बाविस्कर, समाधान पाटील, चेतन रोकडे उपस्थित होते. या शिबिरासाठी दीपक वाघ, सिस्टर अंजना नागरगोजे, विकास गायकवाड, सतीश बनसोडे, प्रमिला गोयर यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक आरोग्यदूत अरविंद देशमुख यांनी केले.
या वेळी डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी म्युकरमायकोसिसची लक्षणे सांगून काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. कोरोना आजारातून बरे झालेले व ज्यांना मधुमेह नाही अशा रुग्णांनी सतत चार महिने दर १५ दिवसांनी मधुमेहाची तपासणी करून घ्यावी. कोरोनाबाबत उपचार घेत असताना आयसीएमआरच्या गाइडलाइननुसार उपचार केल्यास म्युकरमायकोसिसचा धोका कमी होण्यास मदत होणार असल्याचेही डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले.
कोरोना आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांनी नियमित सकाळी मोड आलेले धान्य खावे. बदाम, दूध, अंडी यासारखे प्रोटिनयुक्त पदार्थ घ्यावेत, यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता वाढून म्युकरमायकोसिस आजाराला आपण दूर करू शकतो, असे डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले.