
चिंचवड : प्रतिनिधी
विधानसभा आणि लोकसभा निवडणुक महायुतीतर्फे लढणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे, असे वक्तव्य देखील त्यांनी केले. चिंवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच पिंपरी- चिंचवड शहरात आले होते. त्यांचं मोठ्या उत्साहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे, संजोग वाघेरे यांच्यासह इतर पदाधिकारी होते.
अजित पवार म्हणाले, विधानसभा आणि लोकसभा आपण महायुतीतर्फे लढणार आहोत. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण येईल. या पूर्वी काँग्रेस पक्षासोबत आघाडी होती तशीच परिस्थिती राहील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्या- त्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील नेत्यांनी आणि नागरिकांनी ठरवायचं की युती करायची की एकट्याच्या ताकदीवर लढायचं. निवडून येणार असाल अशी खात्री असेल तर तुम्ही युती करू नका. मतांची विभागणी न होता युती केली पाहिजे, तर युती करा, असे अजित पवार म्हणाले.
आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही
श आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. मला सत्कारावेळी अनेकांनी सर्व महापुरुषांशी निगडीत वस्तू दिल्या, त्या मी घेतल्या. जर त्या घेतल्या नाही तर म्हणणार, हा उपमुख्यमंत्री झाला तर काय नाटकं करतोय, किती ताटलाय असे म्हणणार? सांगायचं तात्पर्य हे की आम्ही भाजप आणि शिंदे गटाच्या सत्तेत सहभागी झालो. पण आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. सर्व- धर्म समभाव हीच आमची विचारधारा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


