हरारे : वृत्तसंस्था
झिम्बाब्वेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकच्या निधनाचे वृत्त खोटे असल्याचे समोर आले आहे.माजी गोलंदाज हेन्री ओलोंगा यांनीच सकाळी त्याच्या मृत्यूची माहिती दिली होती परंतु, आता त्यांनी पुन्हा ट्वीट करून हीथ स्ट्रीक जिवंत असल्याची माहिती दिली आहे.
झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक याचे कर्करोगाशी लढताना निधन झाल्याचे वृत्त पसरले होते. माजी क्रिकेटपटू आणि हीथ स्ट्रीक यांचे मित्र हेन्री ओलोंगा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. त्यांच्या ट्वीटनंतर अवघ्या क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. जगभरातील प्रसिद्धी माध्यमांनी हीथच्या मृत्यूची बातमी दिल्यानंतर आता हीथ स्ट्रीक जिवंत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. ओलोंगा यांनी एका चॅटचा स्क्रीनशॉट ट्वीट केला असून त्यात तो जिवंत असल्याचे सांगण्यात आले आहे. ओलोंगा यांनी आधीचे ट्वीट डिलिट केले आहे.
झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या स्ट्रीकने २००० ते २००४ दरम्यान आपल्या देशाचे नेतृत्व केले. त्याच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ६५ कसोटी सामने आणि १८९ एकदिवसीय सामने खेळलेत. झिम्बाब्वेच्या क्रिकेटची प्रतिष्ठा देखील काही वेळा त्याने एकट्यानेच राखली. झिम्बाब्वेकडून कसोटी सामन्यांत १०० विकेट घेणारा तो एकमेव क्रिकेटर आहे.
