शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखांचा धावता दौरा संशयाच्या भोवर्‍यात

0
67

जळगाव ः गणेश पाटील
नुकताच दोन दिवसांपूर्वी झालेला शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखांचा धावता दौरा संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे.या दौर्‍यासंदर्भात कार्यकर्ते, पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांच्यातही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर देखील या दौर्‍यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळे जाणून घेण्यासाठी अनेकांना फोन आल्याचे समजते.
इतका काय महत्त्वाचा विषय होता की, संपर्क प्रमुखांना विमानाने तात्काळ त्यासाठी धाव घ्यावी लागली.पक्ष बांधणीची जबाबदारी पार पाडण्यासाठी खरं तर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.जे कार्यकर्ते सेनेत आहेत ते टिकवून नवीन वाढीसाठी त्यांचेकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. इथ सत्ता मिळूनही कार्यकर्ते व पदाधिकारी यांची कामे होत नसल्याने त्यांचेकडे नेहमीच गार्‍हाणे मांडत असतात. त्यांच्या व्यथा, भावना,पक्षाबद्दलची आस्था लक्षात घेता,त्यांचा दौरा गांभिर्याने घेवून त्यांचे निरसन करण्याची गरज आहे.त्यासाठी मात्र संपर्क प्रमुख सावंत यांना वेळ नाही.सत्ता मिळूनही कार्यकर्ते, पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांचा भ्रमनिरास झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.संपर्क प्रमुखांकडे गार्‍हाणी मांडूनही काही उपयोग होत नसल्याचे मोठे दुःख सैनिकांना आहे. त्यामुळेे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे.कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या भावनांना न्याय देण्यासाठी संपर्क प्रमुखांकडे वेळ नाही परंतु एखाद्या ‘अर्थ’ पूर्ण विषयात तोडगा काढण्यासाठी विमानाने तात्काळ जळगावी धाव घेऊन कुणालाही न भेटता दौरा आटोपून निघून जाणार्‍या संपर्क प्रमुखांना वेळ मिळालाच तरी कसा? याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
या दौर्‍याप्रसंगी रात्रीच्या पार्टीत मनपाला पक्षाच्या एका पदाधिकार्‍यांकडून पुरवठा होणार्‍या तुरटीच्या ठेक्यासंदर्भातही वादंग झाल्याचे कळते. त्याचा ठेका काढून एका नेत्याच्या नातेवाईकाला सदरचा ठेका देण्याचा घाट रचला जात असल्याचेही बोलले जात आहे.दर महिन्याला पाणी शुद्धीकरणासाठी लाखो रुपयांची तुरटी मनपाला लागत असते. हाही एक दुसरा मुद्दा धावत्या दौर्‍यामागील असावा, असाही एक कयास लावला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here