मुंबई ः प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे. १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांना जेलवारीही झाली होती. आता याप्रकरणात अनिल देशमुख यांनी भाजपाला लक्ष्य करत त्यांनी मोठा आरोप केला आहे.
“भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा समझोता करण्यासाठी दबाव होता.समझोता करण्यास नकार दिला, त्यामुळे परमवीर सिंग यांना माझ्यावर खोटे आरोप करायला लावले आणि माझ्यावर कारवाई करायला लावली, हे शंभर टक्के खरे आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव होता, मी सरळ सांगितले की, मी कोणत्याही पद्धतीने समझोता करणार नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर रेड पडली. आणि माझ्यावर कारवाई करण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे”, अशी धक्कादायक माहिती अनिल देशमुखांनी आज दिली. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
अनिल देशमुख यांच्यावर नेमके आरोप काय?
अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये २०२२च्या जून महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. परमबीर सिंह यांनीच हे आरोप केले आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईला सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.