जळगाव : प्रतिनीधी
नियमांचे काटेकोर पालन, वेळीच लसीकरण करून आपण कोरोनापासून बचाव करू शकतो. त्यामुळे पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने लस घ्यावी, असा सल्ला अमेरिका येथील पूजा चौधरी यांनी दिला. लेवा यूथ फोरमने आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यापासून बचावासाठी निर्माण केलेल्या लसीबद्दल अनेकांमध्ये गैरसमज व भिती आहे. ही भीती दूर करण्यासाठी लेवा यूथ फोरमने ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात लस : वाईट की चांगली, लसीकरणाचे फायदे समजवण्यात आले. प्रथम फोरमच्या डोंबिवली येथील सदस्या भाविका पाटील यांनी प्रास्ताविक केले. डोंबिवली येथील अंकिता महाजन यांनी गणेश वंदन केले. यानंतर फोरमचे अध्यक्ष हर्षल भंगाळे यांनी संवाद साधला. नंतर मंडळाच्या सदस्या मानसी चौधरी यांनी वक्त्या तथा अमेरिका येथील पूजा चौधरी यांची ओळख करून दिली. पूजा चौधरी यांचे मूळ गाव न्हावी (ता.यावल) येथील आहेत. त्यांनी एम टेक इन बायोलॉजी असे शिक्षण घेतले. त्यांनी अमेरिकेतील ऍरिझोना येथून एम-एस केले आहे. त्या सध्या ड्युक ह्युमन व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट, डरहॅम, नॉर्थ कॅरोलिना येथे संशोधन करत आहेत. पूजा चौधरी यांनी कोरोना या विषयाचे दुष्परिणाम तसेच त्यावर प्रतिबंध म्हणून शोधण्यात आलेल्या लसींची माहिती दिली. ही लस आपल्यासाठी तसेच परिवारासाठी कशी महत्त्वाची आहे? हे समजावून सांगितले. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. किरण नेमाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन सचिव स्नेहल अत्तरदे (डोंबिवली) केले.