मुंबई : प्रतिनिधी
टोल बांधण्याचा सल्ला देणाऱ्या भाजपने दुसऱ्यांचा पक्ष फोडण्यापेक्षा आपला पक्ष बांधायला शिकावा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल भाजपच्या वर्मी घाव घातला होता. त्यावर ‘पक्ष वाढवायला विश्वास निर्माण करायला लागतो’ अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
१९८४ मध्ये लोकसभेत भाजपच्या दोन जागा होत्या. आज देशात ३०३ जागा झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. एवढं बहुमत गेल्या २० वर्षात कुठल्याही पक्षाला मिळालं नव्हतं. पक्ष वाढवण्यासाठी विश्वास निर्माण करायला लागतो, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणासाठी काम करावं लागतं. पक्ष वाढवण्यासाठी आयुष्यातील १८-१८ तास द्यावे लागतात. संवाद करावा लागतो, प्रवास करावा लागतो, सर्व समाज, धर्मात एक जागा निर्माण करावी लागते. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आम्ही कुठल्याही पक्षातील लोक जबरदस्ती आणत नाही, आम्ही कोणाच्या घरी जात नाही. पण आम्ही काही संन्यासी नाही, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत. भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवून कोणी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली, तर आमचा दुपट्टा तयार आहे. राज ठाकरे यांनी उलट तारीफ केली पाहिजे, पक्षाचा विस्तार हा प्रवास आणि संवादाने झाला. आम्ही विश्वासार्हता निर्माण केली. आम्ही कधीच फोडाफोडीचे राजकारण केले नाही. उलट आमच्याशी बेईमानी झाली. फडणवीस अष्टपैलू नेते असल्याचा विश्वास वाटल्याने अनेक जण आमच्या पक्षात येतात.असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना आपला पक्ष वाढवण्यासाठी भाजपवर टीका करणे अपेक्षित आहे. त्यांच्याशी आमची मैत्री आहे आणि राहील, त्यांच्या टिकेला उत्तर देणं आमचे काम आहे. राज ठाकरे हे अभ्यासू आहेत. त्यांनी किमान भाजपच्या कामाची पद्धत समजून घेतली पाहिजे. आमचे कार्यकर्ते कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करतात, हे समजून घेतलं पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज्यभरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होऊन ९ महिने झाले तरी फेन्सिंग बसवलेलं नाही. मागच्या महिन्यात अमित (ठाकरे) नाशिकला निघाला होता. तिथे टोलनाक्यावर त्याची गाडी अडवली, काही प्रकरण घडलं, पुढे टोलनाका फुटला. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपने आम्हाला सांगितलं की कधीतरी रस्ते आणि टोलनाकेही बांधायला शिका. मला त्यांना सांगायचंय की फक्त दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा कधीतरी आपलेही पक्ष बांधायला शिका, असे राज ठाकरे म्हणाले होते.