यावल ः ता.प्रतिनिधी
रावेर, यावल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यापैकी अनेक कोरोना बाधितांवर उपचार करताना कृत्रिम प्राणवायू पुरवावा लागतो. त्यामुळे रावेर आणि यावल या दोन्ही ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याची मागणी कृषि मित्र स्व. हरिभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे अमोल हरिभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
यावल, रावेर तालुक्यात शहरी भागांसह खेड्यापाड्यात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. त्यामुळे सर्व गरजू रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा व्हावा, यासाठी यावल व रावेर येथील ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. या प्रकल्पांमुळे वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होऊन रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी करता येईल. रुग्णांच्या नातेवाइकांची इतरत्र होणारी धावपळ टळेल. विशेषत: यावल, रावेर तालुक्यातील आदिवासी बांधवांची आरोग्यसेवा ग्रामीण रुग्णालयांवर अवलंबून आहे. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहिल्यास कायमस्वरुपी अडचण सुटेल. कोविडची आपत्कालीन स्थिती पाहता रावेर व यावलमध्ये प्राधान्याने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारावे, अशी मागणी अमोल जावळे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.