पुणे ः प्रतिनिधी
अजितदादा आणि शरद पवार यांची पुण्यात शनिवारी गुप्त बैठक झाली असली तरी राज्यभरात सध्या तिची चर्चा सुरू आहे. दोघांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील आता समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत उरलेल्या आमदार, खासदारांनी आमच्यासोबत यावे.आमच्या निर्णयाला शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत, अशी गळ अजित पवारांनी यावेळी शरद पवारांना घातली, अशी माहिती आहे.
दिल्लीलाही होती माहिती
विशेष म्हणजे या गुप्त बैठकीची पूर्वकल्पना दिल्लीलाही होती. सगळ्या परिस्थितीवर दिल्लीचे वरिष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारीक लक्ष ठेवून होते. पूर्वनियोजित आखणीनुसार हे चालू होते, असेही सांगितले जात आहे.
अन्य खासदारांना पाठवा
प्राप्त माहितीनुसार,आधी पुण्यातील एका हॉटेलमध्ये अजितदादा आणि शरद पवार यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले मात्र, नंतर पुण्याचे सुप्रसिद्ध बिल्डर अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी ही गुप्त बैठक घेतली.यावेळी आपण येणार नसाल तर पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि अन्य खासदारांना तरी पाठवा, अशी गळ अजित पवार यांनी शरद पवारांना घातली.
शरद पवारांनी आशीर्वाद द्यावेत
तसेच, सुप्रिया सुळे सोबत आल्या, आपण आम्हाला आशीर्वाद दिला असे सांगितले तर सगळ्यांच्याच दृष्टीने चांगले होईल, अशीही गळ अजित पवारांनी घातल्याचे वृत्त आहे मात्र शरद पवार यांनी या गोष्टीला ठाम नकार दिल्याचे सांगितले जात आहे.
सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद
पक्षात एकोपा रहावा. कुठलीही कटुता येऊ नये, यासाठी तुम्ही सुप्रिया पवार सुळे यांना आमच्यासोबत पाठवा. त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळेल.पक्ष एकसंघ राहील. भाजप आणि राष्ट्रवादी असे मिळून आपण सत्तेत राहू शकतो. जे आमदार अजून सोबत आलेले नाहीत, त्यांनादेखील तुम्ही सोबत पाठवा,अशी विनंती अजित पवारांनी शरद पवारांना केल्याचे समजते.
भाजपाबरोबर जाणार नाही : शरद पवार
भाजपाबरोबर युती करण्याच्या चर्चेवर शरद पवार काल माध्यमांशी बोलतांना म्हणाले, “भाजपाबरोबर युती करणं, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपाबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकार्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का? असा प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार नाही.”