चाळीसगाव ः प्रतिनिधी
लष्करातील जवान फौजी नेहमी सीमेवर आपले रक्षण करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस, थंडी अंगावर झेलत बारा महिने सर्व ऋतू आपली सेवा अत्यंत कठोरपणे बजावत असतात. बायको, मुले, आई, वडील यांच्यापासून लांब हा सैनिक आपले कर्तव्य पार पाडतो आणि परिवाराच्या भेटीसाठी काही दिवसांच्या सुट्टीवर घराकडे येतो मात्र नितीन पाटील हे फौजी आपले कर्तव्य बजावत असताना काही दिवसांच्या सुट्टीवर घरी आले असले तरी या कोरोना महामारीतील ही भयंकर परिस्थिती पाहून रुग्णसेवेसाठी सतत काम करीत आहेत.
मग ते रुग्णांच्या नातेवाइकांना धीर देण्याचे काम असो किंवा शहरातील दवाखान्यांमध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटला जेवणाचा डबा पुरवण्याचे काम असो, वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवारातर्फे चाळीसगाव शहरातील दवाखान्यामध्ये ऍडमिट असलेल्या पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना पुरविण्यात येणारे मोफत जेवणाचे डबे वाटपाचे काम अत्यंत आनंदाने, सेवाभावी वृत्तीने नितीन पाटील रोज आवडीने करतात.यासंदर्भात ते म्हणतात की,मी माझे कर्तव्य पार पाडीत आहे.नितीन पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.