जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून ऑनलाइन सभेतून बाहेर पडलेल्या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी या सभेनंतर सोमवारी रात्री पालकमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी सत्ताधारी सदस्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबत तीनही पक्षश्रेष्ठींशी बोलून याबाबत निर्णय घेणार असल्याचे ठरवल्याची माहिती महाविकास आघाडीच्या गटनेत्यांनी दिली. भाजपच्या अनागोंदी कारभारासह अधिकार्यांची मनमानी, दिरंगाई या विषयाची गार्हाणेही सदस्यांनी पालकमंत्र्यांपुढे मांडली.
जिल्हा परिषदेतील भाजपच्या पदाधिकार्यांविरोधात महाविकास आघाडीच्या सदस्यांनी रणशिंग फुंकले आहे. या पंचवार्षिकचा कालावधी ८ महिने राहिले असताना सत्ताधारी गटाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याच्या हालचाली शिवसेना, राष्ट्रवादी व जिल्हा कॉंग्रेस या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सुरू केल्या आहेत. सोमवारी झालेल्या सभेतील अभिसरण शुल्कासह अर्थसंकल्पाच्या विषयावर विरोधकांनी पदाधिकार्यांसह अधिकार्यांना धारेवर धरले. आघाडीच्या सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर सभेत झालेल्या विषयांसह जामनेर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भोंगळ कारभार यासह जिल्हा परिषदेत सत्तांतर कसे करता येईल? या विषयावर रात्री अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील
यांची भेट घेतली. या वेळी शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, उपगटनेते रवींद्र पाटील, दीपकसिंग राजपूत, कॉंग्रेसचे प्रभाकर सोनवणे उपस्थित होते.