जळगाव : प्रतिनिधी
चौपदरी महामार्गाच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराची तिघ्रेनजीक कॅम्प परिसरात शेताच्या बांधावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान, कामगारांच्या निवासस्थानी या आत्महत्येनंतर संशयकल्लोळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तीन महिन्यापूर्वी झारखंडमधील दोंदिया पो.अंबा जुरवाडी जि.जरमुण्डी दुमका येथील तरुण संतोष रॉय भीम रॉय (वय २३) हा तिघे्र ता.जळगाव येथे आला होता. तो नियमित कामावर होता. काल रात्री कामकाज आटोपून तो आपल्या सोबत काम करणार्या मजुरांसह झोपून गेला होता. आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तिघे्र शिवारातील शेनफडू पुंडलिक पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला. त्याला तातडीने गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषीत केले. त्यानंतर रॉय याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. रविंद्र इंधाटे हे करीत आहे.
सदर गुन्ह्याच्या माहितीकामी ‘साईमत’ प्रतिनिधीने कंपनीचे तिघ्रे नजीक असलेल्या कॅम्प परिसरात जावून पाहणी केली असता मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण दिसून आले होते. तसेच कंपनीच्या कॅम्प परिसरात कुणासही येण्यास व जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. याआधीही या कंपनीतील दोन मजुरांचे मृतदेह वाघुर नदीपात्रात मिळून आले होते. यामुळे आज कॅम्प परिसरात असलेल्या संशयास्पद वातावरणाने संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. तसेच कॅम्सच्या गेटवर असलेले संग्रामसिंग पाटील यांनी प्रतिनिधीला सांगितले की, आम्हाला कॅम्प परिसरात येवू देण्यास किंवा कॅम्प परिसरातून जाण्यास कुणासही परवानगी नाही, असे वरिष्ठांनी सांगितले आहे. कंपनीतील मजुरांच्या टप्प्या-टप्प्याने होणारे मृत्यू नेमके कशाने होत आहे, हा संशोधनाचा विषय असून रॉय याने गळफास घेतला की त्यास कुणी घेण्यास भाग पाडले, याचे सत्य पोलीस तपासांअतीच समोर येईल एवढे मात्र खरे!