चोपडा ः प्रतिनिधी
येथील कोरोनाची परिस्थिती आता अगोदरपेक्षा चांगली आहे.आता कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. म्हणजेच मागे १० दिवस केलेल्या लॉकडाऊनचाच हा परिणाम आहे, असे म्हणावे लागेल. मात्र, तरीही मागील वाढलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आताही उपजिल्हा रुग्णालय व खाजगी कोविड सेंटमध्ये रुग्णांची संख्या भरपूर आहे व कोरोना झाला म्हणजे रेमडीसिवर हे इंजेक्शन द्यावेच लागेल, ही डॉक्टरांसोबतच सर्वसामान्यांची धारणा होऊन गेली आहे.
त्यामुळेच कि काय रुग्णांचे नातेवाईक चोपड्यात प्रत्येक मेडीकलवर डॉक्टरांनी दिलेली चिट्ठी घेऊन फिरतांना दिसत आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून त्यांना रेमडीसिवीर मिळाले नाही, अशा कित्येक लोकांच्या तक्रारी आहेत. तरी स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीवर नियंत्रण आणून योग्य ती कारवाई करावी, अशी आशा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
चोपड्यात या कोरोना काळात होणार्या नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्याकरीता मागील आठवड्यात खा.रक्षाताई खडसे यांनी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये डॉक्टरांकडून जास्त बिल आकारणे, रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, सिटीस्कॅन सेंटर्सवरील अनियमितता अशा इतरही समस्यांवर चर्चा करुन त्यावर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांना यासंबंधी योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना खासदारांमार्फत देण्यात आल्या. तत्पश्चात स्थानिक प्रशासनामार्फत ‘वॉर रुम’ स्थापन करण्यात आले. त्यामध्ये वेगवेगळ्या समस्यांकरीता वेगवेगळे अधिकारी नेमण्यात आले. महत्वाचे म्हणजे औषधींची माहिती अपडेट करण्याकरीता म्हणजेच रेमडीसिवरबद्दल माहिती अपडेटकरीता जे.पी.पाटील व नदिम शेख यांना ती जवाबदारी देण्यात आली. तीही फक्त नावालाच, असे वाटते. कारण यांना कोणीही फोन केला की, आतापर्यंत कुठलेच अपडेट नाही, आले की तुम्हाला कळविले जाईल, असे उत्तर मिळते.
दि.०७ एप्रिल रोजी चोपडा शहरात दुपारीच रेमडीसिवीर इंजेक्शन आले असतांनाही संबंधित अधिकार्यांनाच ती माहिती संध्याकाळी देण्यात आली. म्हणजे वॉररूममध्ये रेमडीसिवीरच्या माहितीची जबाबदारी देण्यात आलेल्या या अधिकार्यांनाच जर वेळेवर माहिती उपलब्ध होऊ शकत नाही तर सर्वसामान्यांचे काय? ही माहिती मुद्दाम यांच्यापासून लपविण्यात आली. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. चोपड्यात रेमडीसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत गोरगरीब रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होतेय् म्हणजेच काळाबाजार होतोय् हे मात्र नक्की. तरी हा काळाबाजार संपुष्टात आणावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.