कापूस खरेदी केंद्रावर व्यापार्‍यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करणार – जिल्हाधिकारी

0
16

जळगाव ः प्रतिनिधी
किमान आधारभूत दराने करण्यात येत असलेली कापूस खरेदी पारदर्शीपणे पार पाडा. कापूस खरेदीचे टोकन देतांना शेतकर्‍यांना अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काल दिला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सहकार, कापूस पणन महांसघ व सीसीआयच्या प्रतिनिधींची बैठक झाली.यावेळी ते बोलत होते.या बैठकीस जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक आर.डी.होले, उपव्यवस्थापक ए. बी. निकम, जामनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील, जळगावचे आर. के. पाटील, पारोळाचे आर.डी.चौधरी, चोपडाचे एन.आर.सोनवणे, सीसीआयचे सहायक प्रबंधक दिनेशकुमार, केंद्र प्रभारी प्रमोद पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, कृषि उत्पन्न बाजार समित्या या शेतकर्‍यांच्या हितासाठी आहे. त्यामुळे किमान आधारभूत दराने कापूस खरेदी प्रक्रिया राबवितांना शेतकरी हितास प्राधान्य द्यावे. जळगाव जिल्हा हा कापूस पिकविणारा जिल्हा असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होते. त्यानुसार कापूस खरेदी केंद्रावर खरेदी करतांना शेतकर्‍यांचा कापूस कमीत कमी वेळात घेता येईल यासाठी नियोजन करावे. शेतकर्‍यांना खरेदीचे टोकन देताना त्याचे चित्रीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाही. कापूस खरेदी केल्यानंतर शेतकर्‍यांना आठ दिवसात त्यांची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. यासाठी शेतकर्‍यांचे बँकखाते आधार लिंक असणे आवश्यक असल्याची जाणीव शेतकर्‍यांना करुन द्यावी. खरेदीची प्रक्रिया राबवितांना शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन होईल याची सर्व केंद्रावर खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले तसेच कटोतीबाबत तक्रारी येणार नाही याची काळजी घेण्याच्याही सुचना त्यांनी दिल्यात. भविष्यात खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी गोडवूनची अडचण येण्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली. यासाठी आतापासूनच गोडावून भाड्याने घेण्याचे नियोजन सीसीआय व पणन महासंघाने करावे. याकरीता बुलढाणा अर्बनच्या अधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत सांगितले. सद्यपरिस्थितीमध्ये जिल्ह्यात सीसीआय व कापूस पणन महांसघामार्फत जिल्ह्यातील १० तालुक्यात एकूण ३४ केंद्रांवर कापूस खरेदी सुरु असून आतापर्यंत सीसीआयच्या ११ केंद्रावर ३हजार ६५४ शेतकर्‍यांचा १ लाख ४० हजार ९३९ क्किटंल कापूस खरेदी केला आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी बैठकीत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here