जळगाव ः प्रतिनिधी
वीकेंड लॉकडाऊनच्या नावाखाली पूर्ण लॉकडाऊन करण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करून कोणत्याही परिस्थितीत व्यापारी सहभागी होणार नाहीत. महाराष्ट्र चेंबरने सर्व व्यापारी संघटनांच्या वतीने राज्य शासनाशी चर्चा करावी. गुरुवारपर्यंत (ता. ८) निर्णय घ्यावा, अन्यथा शुक्रवारपासून (ता. ९) सर्व व्यापारी व्यवसाय सुरू करतील, असा इशारा व्यापार्यांनी दिला आहे.
लॉकडाऊनच्या निर्णयानंतर राज्यभरातील व्यापार्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे.या विषयी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील व्यापार उद्योग जगताची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजतर्फे मंगळवारी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रमुखांची ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबरच्या ट्रस्ट बोर्डाचे चेअरमन आशिष पेडणेकर, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख राजेंद्र बाठीया, कमेटीचे चेअरमन मोहन गुरनानी यांच्यासह कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, मराठवाडा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, धुळे, सोलापूर, परभणी आदी विविध जिल्ह्यातील व्यापारी संघाचे प्रमुख या बैठकीत सहभागी झाले होते.
राज्यभरातील व्यापारी संघांच्या प्रमुखांनी सर्व उपस्थितांच्या सूचनांचा विचार करून, या संबंधी राज्य शासनाला दोन दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजतर्फे घेण्यात आला. राज्य शासनाला या संदर्भातल्या ठरावाची प्रत पाठवण्यात आली.
टावरी, गांधी, मकरा सहभागी
उपस्थित सर्व प्रतिनिधींच्या सूचनांचे एकत्रीकरण करून त्याचा आढावा वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी घेऊन राज्यभरातल्या व्यापारी संघाने महाराष्ट्र चेंबरवर दिलेली जबाबदारी चेंबर समर्थपणे पार पाडेल, अशी ग्वाही सर्वांना दिली. बैठकीत जळगावातून पुरुषोत्तम टावरी, दिलीप गांधी, युसूफ मकरा यांनी विचार मांडले व चेंबरच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला.चेंबरचे निर्देश आल्यावर जळगाव जिल्ह्यातर्फे आंदोलनाविषयी सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.