जळगाव ः प्रतिनिधी
वयाच्या साठाव्या वर्षी शंभराव्यांदा रक्तदान करुन रामचंद्र दिगंबर देशपांडे यांनी समाजासमोर आदर्श स्थापित केला आहे. आतापर्यंत ३०० जणांना जीवनदान देण्यात यशस्वी झाल्याबद्दल स्वत:ला भाग्यवान समजतो, अशा भावना त्यांनी रविवारी रेडक्रॉस रक्तपेढीत रक्तदान केले, यावेळी व्यक्त केल्या. कोरोनाला घाबरून न जाता रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
वृत्तपत्राच्या कार्यालयातून निवृत्त झालेल्या देशपांडे त्यांच्या पत्नी शुभांगी देशपांडे यावेळी उपस्थित होत्या. राज्य रक्त संक्रमण परिषदेने वयाच्या ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करण्याची मर्यादा वाढवल्याने माझ्यासारख्या रक्तदात्यांना रक्तदान करणे शक्य झाले,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कोरोना काळातही निवृत्त झाल्यानंतर वयाच्या ६० व्या वर्षी रक्तदान करणे हे कौतुकास्पद आहे. मला विश्वास आहे की, आपल्यासारखे रक्तदाते असताना रक्तपेढीला रक्ताची टंचाई भासणार नाही अशा शब्दांत रक्त केंद्राचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी त्यांचे अभिनंदन केले.रेडक्रॉसच्या वतीने देशपांडे दांपत्याची सन्मान करण्यात आला. या प्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.प्रकाश जैन, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनिता वाघ हे या वेळी उपस्थित होते.
या दात्यांनी केले प्लाझ्मा दान
काही दिवसांपासून रेडक्रॉस रक्त संकलन केंद्रामार्फत प्लाझ्मा दानासाठी आवाहन करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद म्हणून पाच प्लाझ्मा दात्यांनी रेडक्रॉस रक्तकेंद्राला संपर्क केला. त्यात सुनिल तापडिया, माधव तापडिया, संजय तापडिया, प्रेम बालाणी, प्रमोद संचेती या दात्यांचा समावेश आहे.