जळगाव ः विशेष प्रतिनिधी
महापालिकेचे उपयुक्त संतोष वाहुले यांनी शनिवारी आपल्या पथकासह शहरातील फुले मार्केट,सेंट्रल फुले मार्केट,सुभाष चौक,घाणेकर चौक आदी परिसरातील अतिक्रमण धारक, हॉकर्स व फळभाजी विक्रेत्यांवर धडक कारवाई केली.दुकानदार,रस्त्यावर फिरणारे आदींवर मास्क न लावल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली.त्याचप्रमाणे दुकानात व दुकानाबाहेर सोशल डिस्टनसिंग न पाळणार्या दुकानदारांवरही त्यांनी कारवाईचा बडगा उगारला.ते खरोखरच कौतुकास्पद आहे मात्र उपायुक्त संतोष वाहुळे जेव्हा स्वतःच ५० लोकांचा ताफा घेऊन फिरतात तेव्हा सोशल डिस्टनसिंगचा पार फज्जा उडविला जात असल्याने त्यांनी त्याचे भान राखायलाच नको काय? असा प्रश्न शनिवारी दंड भरलेल्या लोकांना पडला आहे.
महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याकडे अतिक्रमण विभागाची जबाबदारी देण्यात आली असून ते अत्यंत प्रामाणिकपणे व कुणाचाही मुलाहिजा न ठेवता अतिक्रमणधारकांवर कारवाई करीत आहेत.या कारवाई अंतर्गत अनेक हॉकर्स,फळभाजी वाले आदींचा माल जप्त करण्यात येत असल्याने वाहुळे यांच्याबद्दल आयुक्त सतीश कुलकर्णी यांची नसेल व नाहीच,तितकी दहशत पसरली आहे.महापालिकेचे नेमके आयुक्त कोण, हे सुद्धा शहरात ठाऊक नसेल परंतु वाहुले यांनाच आयुक्त म्हणून संबोधल्या जाते आहे.ते खरोखर चांगलेही म्हणावे.शहराच्या, विशेष करून फुले मार्केट,सेंट्रल फुले मार्केट,गांधी मार्केट,घाणेकर चौक, सुभाष चौक,साने गुरुजी चौक ,शिवाजी रोड ,बळीरामपेठ आदि परिसरातील अतिक्रमण व हॉकर्स तसेच फळ भाजी विक्रेत्या मंडळीत श्री.वाहुळे यांची प्रचंड दहशत असल्याने त्यांचे नुसते नाव काढले तरीही ते सैरावैरा पळतात, ही सत्यस्थिती नाकारता येणार नाही.
याच संतोष वाहुले यांच्याकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील गर्दीवर नियंत्रण अर्थात सोशल डिस्टनसिंगचे पालन होते की नाही,लोक मास्क लावतात की नाही, दुकानात गर्दी होत असल्यास कारवाईची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली असावी.हे चांगले व कौतुकास्पदच आहे.कारण त्यांच्या कार्याचा आधीच दरारा व ते कुणाचाही दबाव आणि मुलाहिजा अथवा हस्तक्षेप न मानता धडक कारवाई करीत असतात.त्याबद्दल वाहुले यांचे अभिनंदन करणे योग्य ठरते.शनिवारी या संतोष वाहुले यांनी वरील परिसरात अतिक्रमण पथक,महापालिकेचे पथक आणि पोलीस बंदोबस्तासह कारवाईचा धडाका लावला होता.
शनिवारच्या कारवाईत वरील परिसरातून तब्बल चार ट्रॅक्टर भरून माल जप्त करण्यात आला,काही आटोरिक्षा व दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आल्या,त्याचबरोबर फुले मार्केट व रस्त्यावर कुठेही गर्दी दिसली,दुकानात गर्दी दिसली अर्थात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा किंबहुना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ठरवून दिलेले नियम पायदळी तुडवीत असल्याचे आढळून आले तर वाहुळे यांनी त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली व काही दुकानांना सील ठोकण्यात आले.ही कारवाई अत्यंत अभिनंदनीय म्हटली जात आहे.यावेळी कुणीही विनामास्क दिसला तर त्यांच्याकडूनही ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
विनामास्क कारवाई करण्यासाठी काही बंधने आहेत,ती पाळली जात नसल्याच्या तक्रारी यावेळी झाल्या परंतु वाहुळेंचा प्रचंड फौजफाटा पाहून कुणी जाहीर तक्रार केली नाही. दुकानात एकच व्यक्ती असेल ,त्याच्या दहा फुटांवर एकही व्यक्ती नसेल तर त्याने मास्क लावला नसेल तर तो नियमभंग होत नाही.तद्वतच कार चालविणारी एकाच व्यक्ती गाडीत आहे,गाडीचे काच बंद असतील व त्याने मास्क लावलेला नसेल तोही नियमभंग होत नाही.अर्थात त्या व्यक्तींवर कारवाई केली जाऊ शकत नाही.मात्र शनिवारच्या कारवाईत साने गुरुजी चौकातील कुमार खादी कलेक्शन या दुकानात मालक एकटेच व त्यांच्या जवळपास १० फुटांवर कुणीच नसतांना त्यांनी मास्क लावला नव्हता म्हणून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.गेल्या महिन्यात महेंद्र राय सोनी कारमध्ये एकटेच,कारची काच बंद असतांना त्यांनी मास्क लावला नाही म्हणून त्यांचे कडूनही ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला होता.त्याबद्दलची चूक नंतर वरिष्ठ अधिकारी लोकांनी मान्य केली होती. आणि शनिवारच्या मोठ्या कारवाईत उपायुक्त संतोष वाहुळेे गर्दीच्या ठिकाणी व सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसलेल्या ठिकाणी कारवाई करीत असताना शहरवासियांनी त्यांच्यावरच बोट उचलले आहे.शनिवारची परिस्थिती अशी की,उपायुक्त संतोष वाहुले यांच्या सोबत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी,महापालिकेचे अन्य कर्मचारी व अधिकारी आणि त्यांच्यासोबत पोलीस दलाच्या आरसीपीच्या दोन तुकड्या ,फोटोग्राफर ,स्वतःचे मोबाईल मिरविणारे स्वयंघोषित फोटोग्राफर आणि त्या ताफ्याच्या मागे बघ्यांची प्रचंड गर्दी.ही सर्व गर्दी नव्हती काय ? आणि या ताफ्यात सोशल डिस्टनसिंगचे पालन होतांना दिसत नव्हते.सोशल डिस्टनसिंग अर्थात सुरक्षित अंतर नव्हतेच .मग यांच्यावर कारवाई कोण करणार ? हा नागरिकांचा प्रश्न आहे.
१८ मार्च रोजी महापालिकेचे महापौर -उपमहापौर निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने पार पडली.त्यावेळी आपले उमेदवार निवडून आल्याच्या आनंदात शिवसेना पदाधिकार्यांनी जल्लोश केला होता.फटाके फोडून ,गुलालाची उधळणकरीत आनंदोत्सव साजरा केला होता.त्यावेळी त्यांच्याकडून नकळत कोरोना नियमांचा फज्जा उडविला गेल्याची वृत्तपत्रातून टीका होताच दुसर्याच दिवशी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे व सुनील महाजन यांनी स्वतःहून सोशल डिस्टनसिंग न पाळणे व मास्क न लावणे प्रकरणी प्रत्येकी ५ हजार अधिक ५०० अशी साडेपाच हजार रुपयांची दंडाची रक्कम मनपा खजिन्यात भरून त्यांनी आपली चूक मान्य केली होती.
संतोष वाहुळे यांनी कुठेही कारवाई करतेवेळी व कारवाईस जातांना जरा मागे वळून जरूर पाहावे. आपल्या मागे किती गर्दी आहे,आपलाच ताफा सोशल डिस्टनसिंगचे पालन करतो आहे काय?, आपल्याच मागे कोणी विनामास्क आहे काय? आपल्याकडून कोण्या निरपराध (कुमार खादीसारख्या)व्यक्तीवर कारवाई होते आहे काय? याची समीक्षा व्हायलाच हवी आणि नियमांची पायमल्ली केली म्हणून ते शरद तायडे व सुनील महाजन यांच्याप्रमाणे स्वतःहून दंड भरून एक आदर्श दाखवतील काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.