रेमडिसीवीरचा कुठेही साठेबाजी किंवा काळाबाजार नाही – सुनिल भंगाळे

0
25

जळगाव ः प्रतिनिधी
कोविड-१९ संक्रमणाच्या महामारीमध्ये जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेचे सर्वच सभासद फ्रंट लाईनवर उभे राहून ‘रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा’ समजून अहोरात्र परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यात रेमडिसीवीर इंजेक्शनच्याबाबत सोशल मीडियावरुन व्हायरल होणार्‍या पोस्टबाबत नागरिकांनी गैरसमज करुन बळी पडू नये, तसेच जिल्ह्यात रेमडिसीवीरचा मुबलक साठा असून सर्वच कोविड सेंटरमधील मेडिकल स्टोअरसह इतरत्र मेडिकल स्टोअरमध्ये रेमडिसीवीरचा साठा उपलब्ध आहे त्यामुळे रेमडिसीवीरची कुठेही साठेबाजी किंवा काळाबाजार झालेला नसल्याचा खुलासा जिल्हा केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
औषधी विक्री करतांना केंद्र शासनाच्या नियमानुसार (डीपीसीओ) असलेल्या एमआरपीने केमिस्ट लोक विक्री करतात. एमआरपी पेक्षा कोणताही केमिस्ट हा जास्त दराने रुग्णांकडून जास्त पैसे घेत नाही. कोव्हीड रुग्णांना औषधोपचारासाठी जास्त खर्च येत असतो याची जाणीव ठेवून जिल्हा केमिस्ट संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये संघटनेच्या पदाधिकारीची मिटींग घेवून सामाजिक बांधीलकी म्हणून कोविडसाठी लागणारे रेमडिसीवीर इंजेक्शन हे ना नफा ना तोटा हा उद्देश ठेवून फक्त रु. १२०० मध्ये सर्व केमिस्ट बांधवांनी विक्री करावे असे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार जिल्ह्यातील सर्व केमिस्ट प्रती इंजेक्शन रु. १२०० प्रमाणे विक्री करीत आहे.
परंतु सोशल मीडियावर केमिस्ट व केमिस्ट संघटनेच्या बाबतीत चुकीचा गैरसमज व दिशाभूल करणार्‍या पोस्ट देण्यात येत आहे. रेमडिसीवीर इंजेकश्‍न कोणत्याही प्रकारच्या जास्त किमतीने विक्री करीत नाहीत. केमिस्ट हा कोणत्याही प्रकारचा काळाबाजार किंवा साठेबाजी करीत नाही याची आम्हास पूर्णपणे खात्री असल्याचेही ते म्हणाले.
सोशल मीडियाने संघटनेच्या बाबतीत चुकीची किंवा जनसामान्यांमध्ये गैरसमज व दिशाभूल करणारी बातमी न देता संघटनेशी संपर्क साधून चर्चा करावी अशी अपेक्षा संघटनेची आहे. आमचे केमिस्ट बांधवांना अशी बदनामी सहन करुन मानसिक त्रासास सामोरे जावे लागत आहे.रेमडिसीवीर इंजेक्शनच्या वितरणासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील रुग्णांचा डाटा गोळा करुन त्याप्रमाणे त्यांचे वितरण जिल्हा संघटना व एफडिए यांच्या संयुक्त विद्यमाने जबाबदारीपूर्वक करीत आहेत. जेणेकरुन कोणत्याही प्रकारचा तुटवडा होणार नाही. जिल्ह्याचे एफडीएचे औषधी निरीक्षक डॉ.अनिल माणिकराव हे एकटे अधिकारी असून सुध्दा ऑक्सीजन या पुरवठा देखील कोविड सेंटरमधील रुग्णांना कमी पडू दिला नाही.त्यांची तब्येत बरी नसतांना देखील गेल्या तीन महिन्यापासून दिवसरात्र फोन २४ तास चालू ठेवून झटत आहेत व संपूर्ण जिल्हा कव्हर करीत आहेत याची सर्वांनी जाणीव ठेवावी.बैठकीत जिल्हाधिकारी अभितीज राऊत यांचेसोबत संघटनेची बैठक झाली. यावेळी शामकांत वाणी, रुपेश चौधरी, पंकज पाटील, अमित चांदिवाल, विलास नेहेते, जगदीश पलोड, अशोक जैन आदींसह केमिस्ट बांधव उपस्थित होते.
रेमडिसीवीर इंजेक्शन हे कोविड सेंटरमधील रुग्णांची असलेली संख्या व त्यांना लागत असलेली इंजेक्शन याची गरज किती असणार हे एफडीएच्या गुगल ऍपवर येणार असून त्यानुसारच त्याचे वितरण होणार आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार रेमडिसीवीर इंजेक्शन हे रिटेलरला ज्या किमतीत (लँडींग कॉस्ट) आले असेल त्यानुसार खरेदी किंमत + १० टक्के मार्जीन + जीएसटी ह्या दराने विक्री करण्यात येणार आहे अशी ग्वाही संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिली.
दरम्यान, रेमडिसीवर इंजेक्शन घेतांना डॉक्टरांचे ओरिजीनल चिठ्ठी + रुग्णांचे आधार कार्ड + पॉझिटीव्ह रिपोर्ट + एचआरसीटी + चिठ्ठीवर सप्लाईड बायचा शिक्का व दिलेल्या इंजेक्शनची संख्या असे पाहूनच द्यावे, असे आवाहन अध्यक्ष सुनिल भंगाळे व सचिव अनिल झंवर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here