जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील दादावाडी परिसरात पाइपलाइनसाठी खोदण्यात आलेले खड्डे तब्बल दोन महिन्यांपासून तसेच सोडून देण्यात आले आहेत. या खड्ड्यात दररोज अवजड वाहने फसतात, रात्रीच्या वेळी दुचाकीधारक, पायी जाणार्यांचे अपघात होत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. याबाबत अनोखे आंदोलन करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने या ठिकाणी आमदार आणि खासदारांच्या नावे सेल्फी पॉइंट सुरू केला आहे.
दादावाडी परिसरात महामार्गाला लागून असलेल्या मंदिराजवळील रहिवासी परिसरात गेल्या २ महिन्यांपासून फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही हा खड्डा बुजवण्यात आला नाही.आतापर्यंत १५ ते २० मोठी अवजड वाहने या खड्ड्य्ात फसली आहेत. रात्रीच्या वेळी अनेक नागरिकांचा या खड्ड्यांमध्ये अपघात झाला आहे.
परिसरातील त्रस्त झालेल्या नागरिकांना सोबत घेत शुक्रवारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी ऍड. कुणाल पवार यांनी या खड्ड्यात आमदार सुरेश भोळे आणि खासदार उन्मेष पाटील यांच्या नावे सेल्फी पॉइंट तयार करून तेथे तरुणांनी खड्ड्यांसोबत सेल्फी काढले.या वेळी ऍड. कुणाल पवार, कुंदन सूर्यवंशी, राहुल पाटील, सचिन नन्नवरे, नितीन जाधव, सागर पाटील, पवन पवार यांनी खड्ड्यात सेल्फी काढून आंदोलन केले.