मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. यामुळे टंचाई निर्माण होऊन उपचारात बाधा येवू शकते. असा बाका प्रसंग टाळण्यासाठी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी लोकसहभागातून ‘ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर’ची खरेदी होणार आहे. त्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हाकेस प्रतिसाद देत व्यापारी,
मेडिकल असोसिएशन, वैद्यकीय आघाडीसह इतर दात्यांनी दोन दिवसांत १८ लाखांचा निधी उभा केला.या रकमेतून आधी दोन ड्युरा सिलिंडर (एक ड्युरा सिलिंडरमध्ये १५ किलो क्षमतेचे ३० सिलिंडर बसतात) खरेदी केले जातील. यामुळे ६५ रुग्णांना सलग ७ तास ऑक्सिजन पुरवठा शक्य होईल. जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग ठरेल.
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सुविधेच्या ४५ खाटा आहेत. तेथील रुग्णांवर उपचारासाठी १५ मिनिटाला एक ऑक्सिजन सिलिंडर लागते. सोबतच २० वाढीव बेडचे काम देखील सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर ६५ खाटांसाठी १०
मिनिटांना १५ किलो क्षमतेचे एक ऑक्सिजन सिलिंडर लागेल.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. त्यामुळे सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्यास रुग्णांचा जीव धोक्यात सापडू शकतो. असा प्रसंग टाळण्यासाठी ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर योग्य पर्याय आहे. त्यामुळे सर्व ६५ खाटांवरील रुग्णांना सलग ७ सात ऑक्सिजन पुरवठा करता येऊ शकतो, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना सांगितले.
त्यानुसार आमदार पाटील यांनी अधिकार्यांसह शहरातील स्वयंसेवी, समाजसेवक, मेडिकल असोसिएशन, व्यापारी असोसिएशन व इतर व्यापार्यांची नुकतीच बैठक घेतली. त्यात पहिल्या दिवशी १० लाख, तर दुसर्या दिवशी ८ लाख असे एकूण १८ लाख रुपये जमले. त्यातून सिलिंडर खरेदी होईल.
आमदारांसह विविध संघटना,
पदाधिकार्यांचा खारीचा वाटा
बैठकीत अवघ्या १५ मिनिटांत १० लाखांचा निधी जमा झाला. त्यात आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे १ लाख, रमेश कडू पाटील (कर्की) २ लाख, सुनील उदे (मुक्ताईनगर) २ लाख, व्यापारी असोसिएशन २ लाख, मेडिकल असोसिएशन १ लाख, अमोल पाटील व कल्याण पाटील (मुक्ताईनगर) २ लाख, दिलीप चोपडे १ लाख, पंकज कोळी ५० हजार व इतरांचे मिळून दोन दिवसांत १८ लाख रुपये जमा झाले. ही रक्कम उपजिल्हा डॉ.योगेश राणे व तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडे सोपवण्यात आली.
