जळगाव ः प्रतिनिधी
केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयातर्फे येथील नेहा महेश मोता याविद्यार्थीनीला ‘मेरीट-कम-मिन्स’ (एमसीएम) अंतर्गत २०२०-२१ या वर्षाची १० लाख ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. श्री कच्छी दशाविशा ओसवाल जैन समाजाचे सदस्य महेश कांतीलाल मोता यांची नेहा ही कन्या आहे. जिल्ह्यातून तसेच जैन समाजातून केंद्र शासनाची मोठी शिष्यवृत्ती मिळवणारी नेहा ही एकमेव विद्यार्थीनी असल्याची शक्यता आहे.
नेहा आयआयएम बंगळुरू मध्ये एमबीएच्या दुसर्या वर्षात शिकत आहे. तसेच पुण्याच्या गव्हर्मेन्ट इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन) ची पदवी तिसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
नेहाने शालेय जीवनापासून विविध शिष्यवृत्ती मिळवल्या आहेत. यात इयत्ता सातवीतील महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती (२००८),एनसीइआरटी, दिल्ली मधील नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिप (२००९),एनसीइआरटी इन्स्पायर्ड वार्ड (२०१०-११), धीरूभाई अंबानी रिलायन्स फाउंडेशनची स्कॉलरशिपचा (२०१३) समावेश आहे. ती दहावीत शाळेतून प्रथम तर बारावीत जळगाव शहरातून प्रथम आणि एमएचसीइटीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून प्रथम आली होती.