जळगाव ः प्रतिनिधी
एरंडोल येथील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात होळी सणानिमित्त तेथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना प्रांताधिकारी विनय गोसावी, भोजन पुरवठा करणारे कृष्णा धनगर यांनी सरप्राइज म्हणून आज पुरणपोळीचे जेवण देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.
एरंडोल येथील कोविड केअर सेंटर येथे ८७ तर ग्रामीण रुग्णालयात २८ असे दोन्ही ठिकाणी १०५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या ठिकाणी क्वारंटाईन असलेले व ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण हे बहुतेक ग्रामीण भागातील आहे. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी येथे उपचार घेणार्या रुग्णांना होळीनिमित्त आपल्या घराची आठवणी येऊ नये म्हणून त्यांच्यासोबत हा सण साजरा करण्याचे ठरवले.
त्यानंतर होळीला कोविड सेंटरमधील सर्व रुग्णांना पुरण-पोळी, खीर, भात, आमटी, पापड, भजी असे जेवण द्यायचे आहे, असे प्रांतांनी येथे जेवण पुरवणारे हॉटेल कृष्णाचे संचालक कृष्णा धनगर यांना सांगितले. त्यांनी त्याला लगेच होकार दिला. होळीच्या दिवशी सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कैलास पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, कृष्णा धनगर, डॉ. राधिका पालवे, खडके येथील माजी सरपंच राजेंद्र पाटील यांनी स्वतः वाढून पोटभर जेवण खाऊ घातले.
रुग्णांनी काढले गौरेवोद्गार
रुग्णांचे जेवण झाल्यानंतर त्यांनी प्रांताधिकारी यांच्याविषयी गौरवोद्गार व्यक्त केले. ‘साहेब, आम्हाला आज तुमच्यामुळे घराची आठवण आली नाही, तुमच्यामुळेच आम्हाला येथे होळी साजरी करता आली,’ अशी भावनिक प्रतिक्रिया काही रुग्णांनी व्यक्त केली. या वेळी रुग्णांच्या चेहर्यावरील आनंद पाहून वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, तुमच्या सोबत होळी साजरी करतांना मोठा आनंद होत आहे. सध्या तालुक्यातून दररोज मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत. त्यामुळे थोडीफार गैरसोय होत असेल तर माफी मागतो. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कैलास पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, कृष्णा धनगर, डॉ. राधिका पालवे, खडके येथील माजी सरपंच राजेंद्र पाटील यांनी स्वतः वाढून पोटभर जेवण खाऊ घातले.
कर्मचारी घेताहेत रात्रंदिन परिश्रम
प्रांताधिकारी विनय गोसावी व वैद्यकीय अधिकार्यांनी आज राबवलेल्या या उपक्रमाबद्दल क्वारंटाईन असलेल्या रुग्णांचे नातेवाईक व शहरवासीयांनी त्यांचे कौतुक केले. कोविड सेंटर येथे डॉ. बृहनाथ साळुंखे, डॉ. अमोल पाटील, रिना बोरोले, गोपाल महाजन, दीपक सोनवणे, सफाई कामगार फरिदा शेख, पिंटू चौधरी हे रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत.