जळगाव ः प्रतिनिधी
जगातील नाटक समृद्ध होतंय, युरोप व इतर खंडातील रंगभूमीला राजाश्रय व लोकाश्रय आहे, तसेच कलेसाठी तिथलं वातावरण पोषक असल्यामुळेच जगभरात रंगभूमी समृद्ध होतेय असे मत जागितक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने पूर्वसंध्येला परिवर्तनतर्फे चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले. ‘जागतिक स्तरावर मराठी रंगभूमी’ वरील चर्चासत्रात रंगभूमीचे अभ्यासक प्रा. अविनाश कोल्हे यांनी आढावा घेतांना आपल्या मर्यादा व क्षमतांचा अभ्यास व्हावा तसेच अमराठी रंगभूमीवरील बदलांचा अभ्यास केल्यास आपली रंगभूमी समृद्ध होऊ शकते असे मत व्यक्त केले.
कलावंतांचे प्रश्न हे जागतिक
नागपूरचे रूपेश पवार यांनी कलावंतांचे प्रश्न हे जागतिक आहेत. प्रत्येक देशातील स्वरूप वेगळे असले तरी सेंसॉरशीप वेगवेगळी आहे असे म्हटले. भुसावळच्या रंगकर्मींनी जागतिक स्तरावर जे प्रयोग होतात ते प्रयोग करण्यासाठी असलेली क्षमता वाढवणे, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कला आत्मसात करणे गरजेचे आहे, तसेच आपले शब्दांमध्ये अडकलेले नाटक बाहेर काढणे गरजेचे असल्याचे मत मांडले.
परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी सरकार बाह्य सेंसॉरशीपचा मुद्दा उचलत मराठी रंगभूमीच्या मर्यादा व बलस्थानं माडंली. जगभरात कुठेही दिवसा नाटक खेळलं जात नाही पण फक्त मराठी रंगभूमीवरच खेळलं जातं ही आपली जमेची बाजू मांडत शक्यता व क्षमतांचा अभ्यास होणं गरजेचं असल्याचे मत व्यक्त केले.
या चर्चासत्रात महाराष्ट्रातून अनेक मान्यवर सहभागी झाले होते. भूमिका मंजुषा भिडे यांनी मांडली तर सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.
शास्त्रशुद्ध शिक्षणाचे वावडे
कणकवली येथील रंगवाचाचे संपादक वामन पंडित यांनी जगभरात कुठेही सेंसॉरशीप नसतांना ती आपल्याकडेच का आहे, याचा विचार करण्याची गरज असून कलावंतांना नाट्यकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षणाचे वावडे असल्याचे प्रतिपादन केले. जगभरातील नाटकात शरीर भाषेला महत्व आहे पण आपली नाटके हे बोलघेवडी होत असल्याचा सूर त्यांनी मांडला. जागतिक स्तरावर मराठी नाटकांना खूप मर्यादा असून जगभरात कलेला जो राजाश्रय असतो तो जोवर आपल्याकडे मिळत नाही तोवर आपण स्वतःच्या मर्यादांमध्ये अडकून राहू. ब्रॉडवे सारखे थिएटर्स आपल्याकडेही निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.