जळगाव ः विशेष प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे.जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने स्वतःची व कुटुंबाची खबरदारी घेत आहे.तथापि गेल्या वर्षापेक्षा यावेळी कोरोनाचा उद्रेक जरा जास्तच झालेला दिसून येत आहे.त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती वाढीस लागली आहे.दरम्यान ज्यांना देव किंवा देवदूत म्हटले जाते त्यातील काही डॉक्टर मंडळी याचे बाजारीकरण करीत असल्याच्या तक्रारी आहेत.या तक्रारी जाहीरपणे नसून खाजगीत करण्यात येत आहेत.तथापि जी व्यक्ती किंवा ज्याच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना बाधित होते त्यांच्याकडून जाणून घेतलेले काही अनुभव पाहता रुग्णास लक्षणे फ्ल्यूची असोत,टायफाईडची असोत,मलेरियाची असो किंवा साधा थंडी-ताप का असेना, त्यास कोरोनाची भीती दाखवीत काही डॉक्टर आपले भले करीत असल्याचीही चर्चा चौकाचौकातील कट्ट्यावर सुरु आहे.
कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिव्हीर हे औषध (इंजेक्शन)परिणामकारक असल्याने या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.सद्य स्थितीत जिल्हा मेडिसिन डिलर्स असोसिएशनने हे इंजेक्शन १२०० रुपयांनाच देण्याचे फर्मान काढले आहे.त्यापूर्वी या औषधांची उपयुक्तता लक्षात घेता मणियार बिरादरीसारख्या काही संघटनांनी गरजूंना हे इंजेक्शन माफक दरात उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला,हे चांगले आणि कौतुकास्पद म्हटले गेले आहे.
तथापि गेल्या वर्षी सर्वदूर जेव्हा सर्वप्रथम कोरोनाचा कहर सुरू झाला होता तेव्हा या इंजेक्शन (रेमडेसिव्हीर)चे नाव आणि उपयुक्तता सार्यांना ठाऊक झाली होती व तेव्हा हेच इंजेक्शन पाच ते सात हजार रुपयांना मिळत होते.उल्लेखनीय की,काही मेडिकल दुकानदारांनीच त्याचा काळाबाजार केल्याचे स्पष्ट झाले होते.जिल्हाधिकार्यांकडे त्याबद्दल तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या .परंतु त्या इंजेक्शन ची गरज पाहता व ज्याला त्याला आपल्या व्यक्तीच्या जीवाची पर्वा असल्याने ‘‘त्या‘‘म्हणजे अवास्तव किंमत घेणार्या मेडिकल दुकानदारांविरुद्ध कोणी तक्रारी केल्या नाहीत. ही बाब त्यावेळी जिल्हा मेडिसिन डिलर्स संघटनेला अवगत नसेल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जेव्हा सर्वत्र त्याबद्दल तक्रारी होत होत्या, कलेक्टरांकडे निवेदने दिली गेली होती त्याचवेळी (गेल्या वर्षी) संघटनेने असे फर्मान काढले असते तर कित्येकांचे पैसे वाचले असते व तसे कौतुकास्पद म्हटले गेले असते.
नाशिक येथील रोहन भदाणे यांनी याबद्दल आपला अनुभव कथन केला आहे.ते म्हणतात की,दुर्दैवाने त्यांचा अहवाल पॉझिटिह आल्याने त्यांनी तज्ञ डॉक्टरांकडे धाव घेतली.गंध घेण्याची क्षमता जाण्यापालिकडे त्यांना कोणतीच लक्षणे नव्हती.तरीही कोरोना बद्दल भीती असल्याने त्यांनी सर्व तपासण्या करून घेतल्या.त्यानंतर कोणती ट्रीटमेंट घ्यायची ,ती घरीच घ्यावी की रुग्णालयात दाखल व्हावे यास्तव त्यांनी २-३ डॉक्टरांचा सल्ला घेतला .तेव्हा त्यांना आरोग्य विमा आहे काय, याबद्दल विचारले गेले व विमा असल्याचे कळल्यावर भदाणे यांना कोरोना किती भयानक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न झाला.नंतर आता त्रास नसला तरी दोन-चार दिवसांनी त्रास वाढू शकतो हे सांगून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला गेला.विम्याचे पैसे वसूल होतील हे सांगितले गेले.वगैरे…
जळगावातही कोरोनासाठी डॉक्टर मंडळींचे वेगवेगळे पॅकेज ठरलेले असल्याचे सांगण्यात येते.साधी सर्दी,खोकला असला तरीही काही डॉक्टर तपासण्या करण्याचा सल्ला देतात व तो अहवाल दुर्दैवाने पॉझिटिव्ह आला (येतोच)तर रुग्णालयात दाखल होण्यासाठी व उपचाराचा खर्च पाच हजार ते २५ हजार रुपये रोज याप्रमाणे आकारला जातो आहे.ज्यांची आर्थिक स्थिती भक्कम किंवा चांगली ते नामांकित दवाखान्यात जातात व जे सर्वसाधारण ते शक्यतो जिल्हा रुग्णालय(कोविड राखीव) अथवा गोदावरीचा आसरा घेतात.दुर्दैवाने याच रुग्णालयात काहींचे मृत्यू होतात.ते कोणत्याही कारणांनी असोत रुग्णांमध्ये भीती निर्माण करून जातात.अन्य रुग्ण त्याचीच भीती बाळगत खचून जातात अशी उदाहरणे आहेत. खाजगीत जाणारांसाठी रुग्णालयात दाखल होणे व घरीच उपचार करून घेणारा साठी वेगवेगळे किंवा ठरलेल्या औषधांचे पॅकेज आहे.त्याला डोस म्हटले जाते व तो डोस पूर्ण घ्यावाच लागतो,त्यासाठी पाच ते सात हजार मोजावे लागतात.संपूर्ण डोस(औषध)डॉक्टरांच्या दवाखान्यात असलेल्या मेडिकलवर मिळतात हे विशेष व उरलेले परत घेतले जात नाही.
कोरोनाच्या काळात येथे असेही सेवाभावी डॉक्टर आहेत ते रुग्णांना धीर देतात व त्यांच्या जवळची अथवा आवाक्यातील औषधे घेण्याचा सल्ला देत आहेत आणि तसे शेकडो रुग्ण बरेही झाले आहेत.सर्दी,खोकला,अंगदुखी ही लक्षणे फ्ल्यू -मलेरियाचीही असू शकतात.तो कोरोनाच असेल असे नाही.पण त्यासाठी तपासण्या करा,सिटीस्कॅन करून घ्या,रक्त तपासा या महागड्या चाचण्या सर्वसामान्यांना परवडणार्या नाहीत परंतु आज कोरोनाच्या संसर्गाबद्दल वेगळेच चित्र निर्माण झाले किंवा करण्यात आले आहे.वास्तवात वेळीच उपचार करून घेतल्यास हा आजार जीवघेणा नाही आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूस डॉक्टरांना कधीच जबाबदार धरता येणार नाही.या आपल्याच चुका आहेत आणि विलंबास आपणच कारणीभूत आहोत हे नाकारून चालणार नाही.
एक लक्षात घ्या ,पूर्वी राजकीय नेते,मंत्री ,माजीमंत्री आदी शैक्षणिक संस्था काढून शिक्षण सम्राट म्हणविले जात होते आणि आजच्या स्थितीत अनेक नेते,माजीमंत्री.पुढारी मंडळी मल्टी स्पेशालिटी दवाखाने काढायला लागली आहेत..त्याच्या मागील कारणमीमांसा लक्षात घेतली पाहिजे.कारण आज वैद्यकीय क्षेत्र असे आहे तिथे रग्गड पैसा(कमाई) होणे अगदीच निश्चित आहे. पूर्वी शिक्षणाचा म्हटला जात होता,आता वैद्यकीय क्षेत्राचा बाजार मांडला जातो आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


