कासोदा-फरकांडे रस्त्याची दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

0
34

कासोदा, ता.एरंडोल ः वार्ताहर
कासोदा ते फरकांडे रस्त्याची दुरावस्था झाली असून ‘रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते’ असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. हा रस्ता कासोदा ते पारोळा जोडणारा मुख्यरस्ता असून या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे अधिकारी जातीने दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावरून प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचे लक्षात येते.
कासोदा ते पारोळा जोडणार्‍या फरकांडे, लोणी मार्गावरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. कारण या मार्गावर जितकी वाहने, तितकेच खड्डे अशी स्थिती आहे. प्रत्यक्षात या रस्त्याला बघून या रस्त्यावर खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ता आहे? असा प्रश्‍न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. या रस्त्यालगत फरकांडे येथे इतिहास कालीन झुलते मनोरे आहेत. तेथेही प्रेक्षकांचे येणे-जाणे सुरू असते. परंतु रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे तिकडेही पाठ फिरविण्यात येते. तसेच पारोळा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी तेथील लहान-मोठे महाविद्यालयात जात असतात. तर कुटीर रुग्णालय असल्याने पारोळ्याकडेही रुग्ण जात असतात. त्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी आणि रुग्ण या मार्गावरून ये-जा करतात. परंतु या मार्गावरून जातांना महामंडळाची बस, खासगी वाहने कित्येकदा बिघाड होऊन पडते. यात विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर पोहचणे जिक्रीचे होऊन जाते.
अशातच जर पावसाळ्यात या मुख्य मार्गावर प्रवास करणे जिकरीचे होते. या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत असतात, कित्येकदा मोटरसायकल घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. कासोदा ते जानफळ येथे पुल तुटल्याने दोन्ही बाजुची वाहने ठप्प होऊन झाते.
कासोद्यापासून ते पारोळा गावाकडे हा मार्ग जातो. कासोद्यातील भवानी माता मंदिरपासून वळण घेताच जीवघेण्या खड्ड्यांची मालिका सुरू होते ती थेट लोणी गावापर्यंत. पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले राहते. यामुळे मुख्य मार्गावर खड्डा कुठे आणि रस्ता कुठे, हे लक्षात येत नाही. यामुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कासोदा हे मोठ्या बाजार पेठेचे गाव असल्याने या रस्त्यांवरून बाजारासाठी व दवाखान्यात जाण्यासाठी लहान-मोठे वाहन येत असते. त्यामुळे खड्ड्यातून वाहन उसळून अतिगंभीर रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. तसेच खड्ड्यांमुळे पाठीचा कणा मोडण्याची शक्यता आहे.
रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
खड्ड्यांचे साम्राज्य पसरण्यापूर्वी रस्त्याची डागडुजी करा अशी मागणी स्थानिकांनी केली होती. परंतु, या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या वाढली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. येत्या ८ दिवसांत रस्तयाच्या कामाला सुरुवात केली नाही तर लोटांगण व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सूचक इशारा सुज्ञ नागरिकांसह शिवसैनिक व ग्रामस्थांनी एका पत्राव्दारेे दिला आहे.
रस्त्याची दुरावस्था झाल्याने गरोदर महिलांना घेऊन जाणे व आणणे खूप जिक्रीचे झाले आहे. तालुक्याचे आ. चिमणराव पाटील व खा. उन्मेष पाटील यांनी लक्ष द्यावे व रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे.
– आशाबाई पाटील
नवनिर्वाचित सरपंच,फरकांडे
जिल्हा परिषद अध्यक्ष, बांधकाम विभाग यांना वारंवार लेखी व तोंडी निवेदन दिले असून यांकडे कोणीही लक्ष देऊन दखल घ्यायला तयार नाही.
– गुड्डू (दिलीप) चौधरी, शिवसैनिक फरकांडे
रस्त्यांवर खड्डे आणि दीड ते दोन फूट खोल साईटपट्टी झाल्यामुळे वाहनचालकांची दैनावस्था झाली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा लेखी व तोंडी निवेदन दिले असून बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
– रविंद्र मन्साराम पाटील
नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य फरकांडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here