भारत बंदचा अनेक राज्यांना फटका

0
98

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत बंदचा फटका देशातील अनेक राज्यांत दिसून येत आहे. दिल्लीच्या अनेक सीमा बंद आहेत. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बिहारमध्ये आणि बर्‍याच ठिकाणी बस आणि गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.छत्तीसगडच्या रायपूरमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली होती.पंजाबच्या मोहालीमध्ये टोल नाका बंद होता.अमृतसरमध्ये बंदच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे प्राथमिका वृत्त आहे.शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर झोपून आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
भारत बंदमुळे दिल्लीतील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. टिकरी, झौदा, धनसा सीमा वाहतुकीसाठी बंद आहेत.पंजाब, हरियाणा, बिहार, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेशात बंदचा व्यापक परिणाम दिसून येत आहे.जहानाबादमध्ये पलामू एक्स्प्रेस गाडी रोखण्यात आली होती. जहानाबादमध्ये पलामू एक्स्प्रेस गाडी थांबली गेली.
नागरिक शेतकर्‍याच्या पाठीशी – राजू शेट्टी
महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात भारत बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, याबद्दल मला समाधान वाटत आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. एका अर्थाने सर्वसामान्य नागरिक देखील शेतकर्‍याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ठ झाल्याचेदेखील शेट्टी म्हणालेत.
कल्याण एपीएमसीमध्ये शुकशुकाट
शेतकरी संघटनांनी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला कल्याण एपीएमसी मार्केटने कडकडकीत बंद पाळून पाठिंबा दिला आहे.कल्याण स्टेशन परिसरात नेहमीपेक्षा कमी वर्दळ दिसून येत आहे तसेच कल्याण एसटी डेपोमध्येही नेहमीप्रमाणे कामावर जाणार्‍या लोकांची आणि बाहेरगावी जाणार्‍या बसेसची गर्दी कमी आहे.
रायगड जिल्ह्यात अल्प प्रतिसाद
आजच्या भारत बंदला रायगड जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही . आज सकाळपासून हॉटेल्स , भाजीविक्रेते स्टॉल व इतर सर्व प्रकारची दुकाने उघडली आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा गड असलेल्या अलिबाग शहरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या अन्य भागातही बंदला फारसा प्रतिसाद नाही.लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेले व्यावसायिक बंदला प्रतिसाद देण्याच्या मानसिकतेत नाहीत, असे चित्र आहे. एसटी वाहतूकही सुरू आहे.
पंढरपुरात बाजार समिती बंद
पंढरपूर, पुणे, कोल्हापुरात देखील भारत बंदला सकाळच्या सत्रामध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे तर पंढरपूरमधल्या शेतकरी आणि व्यापार्‍यांनी बंदला पाठिंबा देत बाजार समिती बंद ठेवली आहे. तर शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात मोर्चा काढण्यात येत आहे. महाविकास आघाडीसह कम्युनिस्ट पक्ष तसेच विविध संघटना या मोर्चात सहभागी होत आहेत.दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकर्‍यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येतोय. फळं आणि भाजीपाला घेऊन येणार्‍या फक्त १७४ गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाल्याचे वृत्त आहे.
पुण्यात दुकाने बंद
शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पुणे येथील व्यापार्‍यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारत बंदलाही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पुण्यात व्यापारी महासंघाने आापला निर्णय बदलला आहे. पुण्यातील सर्व दुकाने दुपारी १२.३०पर्यंत बंद राहणार आहेत.
दरम्यान ओडिशात डावे राजकीय पक्ष, कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी भुवनेश्‍वर रेल्वे स्थानकात रेल्वे थांबविली.आंध्र प्रदेशात आजच्या भारत बंदला पाठिंबा देत डाव्या राजकीय पक्षांनी विजयवाड्यात आंदोलन केले व केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात निदर्शने केलीत.
भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबई एपीएमसीत आज कडकडीत बंद ठेवण्यात आला. एपीएमसीमधील पाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या आहेत. नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकर्‍यांसोबत माथाडी कामदारांचाही रोजगाराचा प्रश्‍न उपस्थित होणार असल्याने माथाडी कामगारही बंदमध्ये सहभागी आहेत.
नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार केवळ चर्चा करत आहे. तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले आहे.
दरम्यान, १८ विरोधी पक्षांनी या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे. दरम्यान या बंदमुळे दिल्लीसह इतर राज्यांतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने २० शेतकरी संघटनांनी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पंजाबच्या २० शेतकर्‍यांच्या नेत्यांनी केंद्र सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची काल भेट घेतली.
बँक संघटनांचा पाठिंबा
शेतकरी आंदोलनाला बँक संघटनांनी पाठींबा दिला आहे. मात्र आज पुकारलेल्या भारत बंद दरम्यान बँका सुरूच राहणार आहेत. भारत बंदमध्ये बँकांचा सहभाग असणार नाही. त्यामुळे बँकांतील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरुच राहाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here