महापालिकेच्या सत्तांतराचा निर्णय चौघांमध्ये ठरला होता : एकनाथराव खडसे

0
19

जळगाव : प्रतिनिधी
महापालिकेत झालेल्या सत्तांतराच्या घडामोडीत कोणताही नेता नाही असे काही नगरसेवक वारंवार सांगत असले तरी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा या सत्तांतरात मोठा सहभाग असल्याचे समजले. या सर्व घडामोडींची सुरुवात एकनाथराव खडसे म्हणतात की, कामानिमित्त त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरुन जिल्ह्याच्या विकासासंदर्भात चर्चा केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत शहराच्या विकासासंदर्भात बोलतांना तुम्ही ठरविले तर विकास शक्य होईल असे म्हणत मनपामध्ये माझ्या पक्षाचा एकही नगरसेवक नाही, असे स्पष्ट सांगितले. यावर मनपाच्या सत्ता बदलाबाबत चर्चा होवून शिवसेना नेते विनायक राऊत व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत म्हणजेच आमच्या चौघांमध्ये याबाबत धोरण ठरले होते, अशी स्पष्ट टिप्पणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली.
एकनाथराव खडसे बोलतांना म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका कामासाठी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी काय म्हणते जळगाव? असे विचारले. शहरात विकास कामे होतच नाहीत. अनेक योजना अपूर्ण आहेत. रस्त्यांची तर पार वाट लागली आहे, असे मी त्यांना सांगितले. शहराच्या विकासाला लागलेले हे ग्रहण आपण सोडवावे, अशी विनंतीही मी त्यांना केली. त्यावर महापालिकेची निवडणूक कधी लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी विचारले. त्यावर निवडणुकीला अजून अडीच वर्षे बाकी आहेत; पण येत्या १५ दिवसांत महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. २२ ते २५ नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. त्यांची सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांविषयी प्रचंड नाराजी आहे. शहरात विकास कामे व्हावीत यासाठी सत्ता बदल झाला पाहिजे, असे त्या नगरसेवकांना वाटते आहे. शहराच्या विकासासाठी शिवसेनेचा महापौर होणार असेल तर मी त्यात मदत करू शकतो, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले. शिवसेना, एमआयएम आणि भाजपमधून बाहेर पडणारे असे मिळून ४५ नगरसेवक होतील, असे मी सांगताच मुख्यमंत्र्यांनी लगेच तयारी दर्शवली. मी कामाला लागतो; पण हा विषय कोणालाही कळू देऊ नका, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर मला विनायक राऊत आणि एकनाथ शिंदे यांना कळवावे लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. राऊत तुम्हाला फोन करतील. त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही पुढची रणनीती ठरवा, असेही त्यांनी मला सांगितले. त्यानुसार राऊत यांचा फोन आला. त्यांना मी सर्व परिस्थिती सांगितली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर विनायक राऊत, एकनाथ शिंदे आणि मी एकत्रित चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सर्व जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवली. त्यानंतर शिंदे आणि मी संपर्कात होतो. त्यावेळीच शिवसेनेचा महापौर आणि फुटीर नगरसेवकांमधून मी सांगेल तो उपमहापौर करायचा असे ठरले होते. चार, पाच दिवसांपूर्वी सुनील खडके व त्यांच्या संपर्कातील १० ते १२ नगरसेवकांनी मुक्ताईनगर येथील फार्म हाऊस येथे रात्री उशिरा माझी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजपतून बाहेर पडल्यानंतर पक्षांतर कायद्याचा फटका बसू शकतो याची जाणीव त्या नगरसेवकांना मी करून दिली होती. जळगावच्या विकासासाठी सत्तांतरासाठी पुढाकार घ्यावा, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली सत्तांतर करू असा विश्वास त्या सर्व नगरसेवकांनी दिला. त्यानंतर नाराज नगरसेवकांची संख्या वाढत गेली आणि आकडा २२ पर्यंत येऊन पोहोचला. यादरम्यान शिवसेनेचे नगरसेवक सुनील महाजन यांनी देखील माझी भेट घेतली. भाजपच्या या असंतुष्ट नगरसेवकांना आधी मुक्ताईनगर येथे एकत्र करण्याचे नियोजन होते. मात्र, त्यांना मुंबईला न्यायचे असल्याने उलटे मुक्ताईनगरला नेण्याऐवजी पाळधी येथे पालकमंत्र्यांकडे जाऊ द्यावे, असे ठरले. तोपर्यंत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या हालचालींची कल्पनाही नव्हती.
या हालचालींबाबत कोणीच कुठे काही बोलायचे नाही, असे आमचे ठरले होते. म्हणून मी जाहीरपणे काही बोलत नव्हतो. भाजपच्या नगरसेवकांना एकत्र करणार्‍या सुनील खडके यांना उपमहापौर करायचे असे शिवसेना नेत्यांशी झालेल्या चर्चेत ठरले होते. पण शिवसेनेने अचानक व्हीप जारी करून नावे जाहीर करून टाकली. त्यामुळे मी काही जणांना फोनही केले होते; पण महापौर ज्या समाजाच्या आहेत त्याच समाजाकडे उपमहापौरपद देण्याऐवजी मराठा समाजाला ती संधी दिली जावी आणि सुनील खडके यांना स्थायी समितीचे सभापतिपद दिले जावे असे मुख्यमंत्र्यांनी सुचवले. ते मलाही पटले. म्हणून ते लगेच मान्य करण्यात आले आहे. खडकेंचे या संपूर्ण प्रक्रियेत योगदान आहेच. ते नाकारता येणार नाही. ही सर्व जुळवाजुळव महिनाभरापासून सुरू होती. एक बटण दाबले आणि सर्व काही घडले असे झालेले नाही. कोणी याबाबत काही दावे करीत असतील तर त्याकडे करमणूक म्हणूनच पाहिले पाहिजे.’ दरम्यान, एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय व विश्वासू मानले जाणारे अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, डॉ. अभिषेक ठाकूर, यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. महानगरपालिकेतील सत्तांतराकरीता एकनाथराव खडसे यांनी यांच्या माध्यमातून ग्राऊंडवर व्यूहरचना आखल्यानंतरच सुरुवातीलाच काही सदस्य गळाला लावण्यात यश आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here