शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील

0
15

जळगाव : प्रतिनिधी
महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उद्या गुरूवारी होणार्‍या निवडणूकीसाठी आज शिवसेनेकडून जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपकडून महापौर पदासाठी विद्यमान महापौर भारती सोनवणे यांच्यासह प्रतिभा कापसे व उपमहापौर पदासाठी मयुर कापसे व सुरेश सोनवणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. सत्ताधारी भाजपच्या गोटातील नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने महापालिकेत सत्ताधारी भाजपचे समीकरण बिघडले आहे. दरम्यान, उद्या होणार्‍या निवडणूकीकडे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय धुरीणांचे लक्ष लागून आहे.
जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या विशेष सभेत नवनिर्वाचीत महापौर व उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठी फूट पडल्यामुळे ही निवडणुक बिनविरोध न होता चुरशीची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी निवडणुक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यांच्या सुचक वक्तव्यानुसार महापालिकेच्या राजकारणाच्या सारीपाटावर मोठा भूकंप झाला व भाजपचे ३० नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहे. दरम्यान, शिवसेना भाजपचे एक तृतीवांश नगरसेवक फोडण्याच्या असल्याच्या पावित्र्यात असून हा आकडा ३८च्या वर जावू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपाला खिंडार पाडत शिवसेनेने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. आज दोन्ही पक्षाच्या वतीने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आलेे. महापौरपदासाठी शिवसेनेकडून जयश्री सुनील महाजन यांनी तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते विलास पारकर, शिवेसना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नितीन लढ्ढा, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, सुनिल महाजन, अमर जैन, चेतन शिरसाळे, नितीन सपके, मानसिंग सोनवणे, रेखाताई सोनवणे आदी उपस्थित होते.
भाजपच्या वतीने महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. महापौर पदासाठी विद्यमान महापौर भारतीताई सोनवणे व प्रतिभा कापसे या दोघांचे तर उपमहापौर पदासाठी मयुर कापसे व सुरेश सोनवणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत गटनेते भगत बालाणी, राजेंद्र घुगे-पाटील, कैलास सोनवणे, शक्ती महाजन, अमित काळे, राधेशाम चौधरी, विरेन खडके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here