जळगाव : प्रतिनिधी
वीज ही अत्यावश्यक सेवा असून, कोरोनाच्या संकटातही जीवावर उदार होऊन महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सेवा देण्यासाठी कार्यरत होते. मात्र ग्राहकांनी वीजबिले न भरल्याने थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे भविष्यातही अशीच कायम अखंडित सेवा देण्यासाठी व वीज खरेदीसाठी महसुलाची गरज आहे. त्यासाठी ग्राहकांना दिलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची रक्कम वसूल करावी, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक तथा मुख्यालयाचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले.
जळगाव परिमंडलात मागील वर्षभरापासून अनेक ग्राहकांनी एकही वीजबिल भरलेले नाही. यात काही विभाग कार्यालयाची वसुली अत्यंत असमाधानकारक असून सर्वांनी बिल वसुली मोहीम प्रभावीपणे राबवावी तसेच वीजबिल भरण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांकडे सातत्याने पाठपुरावा करावा. याबरोबरच ग्राहकांनीही बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. अन्यथा नाईलाजास्तव नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. यासोबतच कृषी ऊर्जा अभियान अंतर्गत नवीन कृषी वीज जोडणी व कृषिपंप ग्राहकांना वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी या योजनेचा प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वीजबिल वसुलीसह ग्राहक सेवेत हयगय करणार्या अभियंते व कर्मचार्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी यावेळी दिला. जळगाव परिमंडलाचे मुख्य
अभियंता दीपक कुमठेकर यांनी दैनंदिन ग्राहक सेवेसोबतच परिमंडलाची थकबाकी शून्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन बैठकीत केले. बैठकीस अधीक्षक अभियंते फारूख शेख, अनिल बोरसे, प्रकाश पौणिकर यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते व अधिकारी प्रत्यक्ष तथा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.