मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २० पुलासांठी ३४ कोटी निधी

0
9

जळगाव ः प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्याला रस्ते विकासासाठी ३४ कोटींचा निधी मिळाला आहे. यातून २० पुलांची कामे केली जाणार आहेत. या कामांना ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २० पुलांच्या बांधकामासाठी ३४ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत संबंधित आमदारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने या कामांना मंजुरी मिळाल्याचे पालकमंत्री पाटील यांनी म्हटले आहे.
त्यात धरणगाव तालुक्यातील धार ते चोरगाव या रस्त्यावर ३ पुलांच्या कामांसाठी ३ कोटी ४१ लाख रूपये, पथराड-वंजारी खपाट ते बोरखेडा रस्त्यावर १ कोटी ४८ लाख व जळगाव तालुक्यातील महामार्ग ते तरसोद रस्त्यावर १ कोटी २८ लाखे व बिलखेडा ते बिलवाडी या रस्त्यावर १ कोटी ३५ लाख रूपये खर्चाच्या कामांना मंजुरी मिळाली. जामनेर तालुक्यातील राज्य महामार्ग ४२ ते सावखेडा, एमडीआर २९ ते शेळगाव, चिंचखेडा ते वाकडी, राज्य महामार्ग ४६ ते गोद्री रस्त्यावर ६ पुलांच्या कामांसाठी १६ कोटी निधी मिळणार आहे.
मालखेडा-शेंदुर्णी रस्त्यावर ३ पुलांच्या कामांसाठी ३ कोटी ३३ लाखांची तरतूद असेल. याशिवाय, पाचोरा तालुक्यातील लोहटार- गाळण – चिंचोले – नगरदेवळा-खाजोळा सारवे बुद्रूक रस्त्यावर पुलाच्या कामांसाठी २ कोटी २१ लाख रूपये, यावल तालुक्यातील सातोद-कोळवद-असारबारी रस्त्यावर २ पुलांच्या कामांसाठी ३ कोटी १९
लाख, रावेर तालुक्यातील भोर-पुनखेडा-पातोंडी-धुरखेडा रस्त्यावर १ पुलाच्या कामांसाठी ४ कोटी १३ लाख, तर बोदवड तालुक्यातील शेलवड-वाकी रस्त्यावर १ पुलाच्या कामासाठी १ कोटी ६ लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
महामार्गासारखे रस्ते बनवू
रस्ते विकासामुळे गावागावापर्यंत आरोग्य, शिक्षण व रोजगार पोहोचतो. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात महामार्गासारखे दर्जेदार रस्ते व पूल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here