जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव शहरात गुरुवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी व खरेदी करणारे घाऊक व्यापारी यांनाच प्रवेश देण्यात आला होता तर किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंद करुन शहरातील किरकोळ भाजीपाला विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले होते.तरी देखील शेतकर्यांनी शुक्रवारी सकाळी कृऊबासमध्ये भाजीपाला आणला. तो विक्री न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारुन रस्ता अडवला. तसेच शेतकर्यांचा भाजीपाला खरेदी होत नसल्याने कृऊबास बंद ठेवण्याचीही मागणी केली. अखेर विक्री न झालेला भाजीपाला शेतकर्यांनी परत नेऊन गुरांना चारला तर काहींनी कवडीमोल दराने त्यांच्या गावात व तालुक्याच्या ठिकाणी विक्री केला.
जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिका क्षेत्रात गुरुवारपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरात किरकोळ भाजीपाला विक्रीला बंदी आहे. शुक्रवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात जळगाव तालुक्यासह इतर तालुक्यांतील शेतकर्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. या वेळी जळगावातील किरकोळ व्यापारी न आल्याने त्यांच्या भाजीपाल्याचा लिलाव झाला नाही. त्यामुळे सकाळी ६ वाजता संतप्त झालेल्या अनेक शेतकर्यांनी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारुन रस्ता अडवला. त्यानंतर व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकार्यांनी समजावल्यानंतर शेतकर्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.