जळगाव ः प्रतिनिधी
सर्वसामान्य जनतेचे जीवन अत्यंत कठीण व असह्य झाले आहे.यावर केंद्र सरकारने त्वरीत तोडगा काढावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाव्दारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,गेल्या ७ वर्षात महागाई, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कुणालाच परवडणार नाही एवढे वाढले आहेत. इंधनाचे भाव वाढल्याने परिणामी वाहतूकीचे खर्चदेखील वाढले व अन्न, धान्य, दैनंदीन वापराच्या वस्तू आदी सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.तसेच अनेक उद्योग, कारखाने, संस्था बंद पडल्या आहेत. करोडो लोक बेरोजगार झाले आहेत, १००हून अधिक दिवस शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाली आहेत.
जळगाव जिल्ह्यात तर रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे, ग्रामीण भाग असो वा शहरी भाग, सर्वच रस्ते हजारो खड्ड्यांनी भरलेले आहेत, धूळीचे प्रचंड लोळ दिवसभर पहायला मिळतात.अनेक वाहनांवर, घरात, कार्यालयात धुळीचे थर साचलेले असतात.कुणाच्याच मागैॅण्या समजून घेवून त्यातून मार्ग काढण्यात अजूनही मोदी सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे उद्योजक, नोकरदार, शेतकरी सर्वच लोकांमध्ये प्रचंड आक्रोश दिसून येत आहे.या सर्वच बाबी गंभीर असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन अत्यंत कठीण व असह्य झाले आहे. यावर केंद्र सरकारने त्वरीत तोडगा काढावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाव्दारे दिला आहे.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनावर माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पाटील, समन्वयक विकास पवार, सरचिटणीस अशोक पाटील, अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन सर, मजहर पठाण, उज्वला शिंदे, विनोद तराळ आदींच्या स्वाक्षर्या आहेत.