जळगाव ः प्रतिनिधी
शहरात अस्वच्छतेच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. कामगार वेळेत काम पूर्ण करत नसल्याने समस्येत भर पडत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. आगामी काळात सरप्राईज व्हिजिट देऊन कामगारांची हजेरी तपासली जाईल. अस्वच्छतेच्या तक्रारी वाढल्यास संबंधित भागातील अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत आरोग्य सभापती जितेंद्र मराठे यांनी कोणाच्याही दबावात काम करू नका असा सल्ला दिला आहे.
आरोग्य सभापतीपदी जितेंद्र मराठे यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली.त्यात नागरिकांकडून येणार्या तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या समस्या जाणून घेत त्यातून मार्ग काढण्याच्या सूचना दिाल्या. बैठकीला सहायक आयुक्त पवन पाटील उपस्थित होते.
ठरवून दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणे अपेक्षित
प्रभागात अनेक ठिकाणी कामगार वेळेत कामावर येत नाहीत. आले तर बराच वेळ एकाच ठिकाणी गप्पा मारत बसलेले असतात अशा तक्रारी आहेत. नागरिक आता थेट अधिकारी व पदाधिकार्यांना फोन करतात. त्यामुळे कामगारांनी वेळेत कामावर हजर व्हावे तसेच ठरवून दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. यापुढे अस्वच्छतेच्या तक्रारी आल्यास त्या भागातील कामगार व अधिकार्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिला.
घंटागाड्यांच्या ३ फेर्या करा
बैठकीत सभापती श्री. मराठे यांनी आरोग्य अधीक्षक व स्वच्छता निरीक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. यात घंटागाड्या प्रभागात फिरताना किमान तीन फेर्या होणे गरजेचे आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचर्याचे जमा झालेले ढीग निदर्शनास येणार नाहीत. अरुंद बोळीत घंटागाड्यात जात नाहीत. त्या ठिकाणचा कचरा संकलन करण्यासाठी हातगाड्या व लोटगाड्या उपलब्ध व्हाव्यात. कचरा उचलण्यासाठी कचरा ट्रॅक्टर व डंपर वाढवून मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.