जळगाव ः प्रतिनिधी
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या जळगाव सीए शाखा व जळगाव सीए विद्यार्थी शाखेला सन २०२०-२१मध्ये केलेल्या विशेष कामगिरीबद्दल डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएआयस्तरावरील उत्कृष्ट शाखा म्हणून द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे जळगाव सीए शाखेचे अध्यक्ष सीए सागर पाटणी यांनी घोषित केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे दरवर्षी महाराष्ट्र, गुजरात, गोवा या स्तरावर चांगली कामगिरी करणार्या सीए शाखांचा गौरव करण्यात येतो. सीए पाटणी यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव सीए शाखेने वर्षभर शैक्षणिकदृष्ट्या विशेष उपक्रम राबवले. तसेच विविध तज्ज्ञांची व्याख्याने, ऑनलाइन वेबिनार, कार्यशाळा, सीए सदस्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, योगा प्रशिक्षण, वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम, गरिबांना अन्नदान, आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आदी कार्यक्रमांमुळे जळगाव सीए शाखेला हा सन्मान मिळाल्याचे सीए पाटणी यांनी सांगितले. हा पुरस्कार मिळण्यासाठी जळगाव सीए शाखेचे व्यवस्थापन समिती सदस्य सीए प्रशांत अग्रवाल, सौरभ लोढा, विकी बिर्ला, स्मिता बाफना यांनी सहकार्य केले.