जळगाव ः प्रतिनिधी
येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली बॉक्स ऑफ हेल्प व जनऔषधी केंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्ताने शहरातील खंडेराव नगरात सॅनिटरी नॅपकिन व मास्कचे वाटप बॉक्स ऑफ हेल्पच्या संस्थापक अध्यक्षा सुधाताई काबरा यांच्याहस्ते करण्यात आले.
सामाजिक कार्यात नियमित अग्रेसर असणारे बॉक्स ऑफ हेल्पतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. संस्थेतर्फे महिलांसाठी तसेच विद्यार्थींनींसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरातील खंडेराव नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील अंगणवाडीत गरजू महिलांना सॅनिटरी नॅपकिन व मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुधाताई काबरा म्हणाल्या की, सध्या शहरात कोरोना सारख्या विषाणूने थैमान माजविले आहे. त्यासाठी आपण आपल्यासह परिवाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी वारंवार हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडणे, गर्दीच्या ठिकाणी जात असतांना मास्क वापरणे, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आदी मार्गदर्शन यावेळी काबरा यांनी केले. प्रसंगी सुमारे परिसरातील २०० महिलांना सॅनिटरी पैड, मास्क वाटप केले.
या कार्यक्रमास स्वाती सोमाणी, मनिषा तोतला, आंगणवाडीच्या योगिता बाविस्कर, कविता, माया चौधरी आदींची उपस्थिती होती. यावेळी अंगणवाडी सेविकांनी आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.