हॉकर्स -फळ भाजीपाला विक्रेते आणि अतिक्रमण विभागाचा लपंडाव !

0
12

जळगाव ः विशेष प्रतिनिधी
जळगाव महापालिकेच्या सभा ,महासभा आणि स्थायीच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या काहीं नगरसेवकांनी अतिक्रमण विभागातील कर्मचारी व अधिकारी अतिक्रमणधारकांकडून पैसे घेतात असे आरोप बर्‍याचदा केले आहेत.त्यांच्या आरोपात तथ्य आहे असे वाटण्याचे कारण म्हणजे शहर कधीच अतिक्रमणमुक्त झालेले नाही.किंबहुना शहरातील कोेणत्याही भागातील अतिक्रमणे, हॉकर्स कायमस्वरूपी हटविण्यात आलेली नाहीत.विशेेष म्हणजे महापालिका अतिक्रमण विभागाची कारवाई नेमकी हटविण्याची की संंवर्धनाची असा प्रश्न पडतो.तो प्रश्न रास्तच म्हटला पाहिजे.तसे यासाठी की, या विभागातील कर्मचारी हॉकर्स-भाजीवाले,फळ विक्रेते आदींना हटविण्याचे नाही,तर फक्त हुसकविण्याचे काम करतात.
आताची लहान मुले लपंंडाव हा खेळ खेळत नाहीत त्यामुळे आताच्या पिढीला लपंडाव म्हणजे काय व कोणता खेळ हे समजावून सांंगावे लागेल किंवा तो खेळ कसा खेळतात ते तरी दाखवून द्यावे लागेल.त्यासाठी मुलांना शास्त्री टॉवर चौकापासून थेट भिलपुरा पोेलीस चौकी,बळीराम पेठेत भरणारा भाजी बाजार,घाणेकर चौक ,सुभाष चौक परिसरात भरणारा भाजी बाजार आणि साने गुरुजी चौकापासून दाणा बाजार चौकापर्यंत लागणार्‍या फळांच्या गाड्या (हॉकर्स) या ठिकाणांवर आणावे लागेल .
त्याचप्रमाणे कॉंग्रेस भुवन समोरच्या जैन मंदिरा बाहेर थाटली जाणारी रेडिमेड कपड्यांची दुकाने (अतिक्रमित)दाखवावी लागतील.या संपूर्ण परिसरात नियमितपणे दररोज अतिक्रमण विभाग कर्मचार्‍यांंची फेरी असते.ट्रॅक्टरवर पाच -सात कर्मचारी या भागातून फेरफटका मारतात.जाता-येता मुद्दाम जोरात हॉर्न वाजवितात.(म्हणज हॉकर्सना सावध करण्यासाठी )अतिक्रमण पथकाचे ट्रॅक्टर जसे लांबून दिसते व हॉर्न ऐकू येतो तसे सारे हॉकर्सवाले सैरभैर होतात.शेजारच्या गल्ली-बोळात जाऊन लपतात आणि ट्रॅक्टर पुढे गेले की ,पुन्हा आपापल्या हक्काच्या जागा ते घेतात.
साने गुरुजी चौकातून शिवाजी रोडकडे अतिक्रमण विभागाचे ट्रॅक्टर जातांना दिसले रे दिसले की, सर्व फळ गाड्या बळीरामपेठेकडे दुर्गादेवी मंंदिराच्या गल्लीत पळतात.सर्व रस्ते अगदी सामसूम.आणि ट्रॅक्टर गेले की पुन्हा गजबज.या प्रकारालाच लपंडाव म्हटले जात आहे.घाणेकर चौकात आणि सुभाष चौकात अतिक्रमण विभागाचे वाहन कधी अर्धा-एक तास ठिय्या ठोकते.तेव्हा जे अतिक्रमणधारक आहे त्याच्याशीच कर्मचार्‍यांच्या गप्पा सुरू असतात. मग काय अतिक्रमण हटणार?
कॉंग्रेस भुवन समोरील जैन मंदिराच्या बाहेर कित्येक वर्षांपासून रेडिमेड कपडे विक्रीची दुकाने थाटली जात आहेत.मंदिराचे व्यवस्थापन ते हटविण्यासाठी प्रयत्न करून थकले असावे परंतु त्या लोकांनी हक्काची जागा सोडलेली नाही.या ठिकाणी जैनबांंधव दर्शनासाठी येतात तेव्हा त्यांची वाहने लावायला जागा नसते.उल्लेखनीय की, याच ठिकाणी तत्कालीन अतिक्रमण विभाग अधीक्षक खान व काही कर्मचार्‍यांवर ते दुकानदार चालून आले होते.इतकेच नाही तर आम्ही पैसे देतो हटवून तर बघा असा दम त्यांनी भरला होता .त्या लोकांंचा आक्रमक पणा पाहून पथकाला तेथून निघून जाणे भाग पडले होते.
या भागातील कोणतेच अतिक्रमण-हॉकर्स हटत नाहीत,त्यांना हटविण्यातही येत नाही .फक्त हुसकावून लावले जाते.म्हणजे …कोल्हा आला रे आला… म्हणतात त्याप्रमाणे.हा प्रकार पाहून शहरातील लोक अतिक्रमण हटाव पथकलाच दोष देऊ लागले आहेत. एवढेच नव्हेतर अतिक्रमण निर्मूलन पथक म्हणजे गमतीचा विषय होऊ लागला आहे.जर हॉकर्सवाल्यांवर हटविण्याची (कायमस्वरूपी)कारवाई होतच नसेल,कर्मचारी तसे काम करीतच नसतील तर मनपाचा अतिक्रमण विभाग आणि कर्मचारी हवेत कशाला ? असाही प्रश्न लोकांमध्ये चर्चिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here