जळगाव ः प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अद्ययावत माता व बालसंगोपन केंद्र (एमसीएच विंग) उभारण्यात येणार असून याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये या प्रकारच्या केंद्रांना मंजुरी मिळाली असून यात जळगावचा समावेश आहे. या कामासाठी तब्बल ३३ कोटी १५ लक्ष ९ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जीएमसीत नवजात शिशूंसह मातांच्या संगोपन व उपचाराची व्यवस्था असली तरी अद्याप येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध नव्हते. या बाबींची दखल घेत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २०१८ मध्ये जिल्हा रूग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत भव्य माता व बालसंगोपन केंद्र उभारण्यात यावे यासाठी पत्र दिले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी सुध्दा आरोग्य खात्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये माता व बाल संगोपन केंद्राला मंजुरी दिली असून यात जळगावचा समावेश आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत उभारण्यात येणारे अद्ययावत माता व बालसंगोपन केंद्र (एमसीएच विंग) हॉस्पिटलच्या आवारातील अलीकडेच काढण्यात आलेली अतिक्रमणे व जुनी निवासस्थाने काढून रिक्त होणार्या तब्बल सहा एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून लवकरच या कामास सुरवात होणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.