जळगाव ः प्रतिनिधी
मराठी साहित्य विश्वातील नव्वोदोत्तरी साहित्यात विशेषतः कवितेच्या प्रांतात कवी अशोक कोतवाल हे महत्वाची कविता लिहिणारे कवी म्हणून ओळखले जातात. त्यांची कविता ही समाजजिवनाच्या वास्तवाची मांडणी तर करतेच पण आपल्या आत आपला शोध घ्यायला आपल्याला प्रवृत्त करते म्हणून ही कविता आज महत्वाची असल्याचे प्रतिपादन कवी अशोक कोतवालांची कविता या कार्यक्रमात परिवर्तनच्या कलावंतांनी केले.
संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन संस्थेचा साहित्य अभिवाचन महोत्सव सुरू आहे, आज महोत्सवाच्या पाचव्या दिवशी हा कार्यक्रम सादर झाला. यात कोतवालाच्या मौनातील पडझड, कुणीच कसं बोलत नाही, नुसताच गलबला या संग्रहातील कविता कलावंतांनी सादर केल्या. यात फ्रॉक, मुलं वाद घालताय, मधल्या सुटीतून पळून जाणार्या मुलांचे मनोगत, ईश्वर, कॉमन मॅन, पाणी, बोलू द्यावं कुणालाही कशावरही, मोनालिसा याकविता सादर करण्यात आल्या. सहज सोपी वाटणारी कोतवालांची कविता आशयगर्भ व वाचकाला अंतर्मुख करणारी आहे. कलावंतांनी अतिशय प्रभावीपणे वाचिक अभिनयाचा उपयोग करत सादरीकरण केले,
यात नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, मंगेश कुलकर्णी, वर्षा चोरडीया, वेदांती बच्छाव सहभागी होते. कवितांच्या कार्यक्रमाचं निवेदन व कोतवालांचा साहित्यिक प्रवास हर्षल पाटील यांनी उलगडून सांगितला. कवितांना बासरीच्या स्वरांचा साज किर्तेश बाविस्कर यांचा होता. कार्यक्रमाची संकल्पना राजू बाविस्कर यांचे होते, दिग्दर्शन होरिलसिंग राजपूत यांचे होते. आज महाराष्ट्रभर गाजलेलं चंद्रशेखर फणसळकर लिखित ‘आमचा पोपट वारला’ या कथेचं अभिवाचन जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे करणार आहेत.