आंध्रात अज्ञात आजाराचे थैमान; ३०० रुग्ण दाखल, एकाचा मृत्यू

0
19

अमरावती : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशातील एलुरूमध्ये एका अज्ञात आजाराने थैमान घातलेय. या रहस्यमय आजाराने जवळपास ३०० लोक रुग्णालयात दाखल झालेत. त्यातच काल एका व्यक्तीला आपल्या प्राणालाही मुकावं लागले आहे.
हा आजार नेमका काय आहे? आणि तो कोणत्या कारणाने फैलावला गेला? याबाबत मात्र डॉक्टारांसमोरही प्रश्‍नचिन्ह कायम आहे.या आजारात अनेक लोक अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळत आहेत.अचानक फीट येणं, बेशुद्ध पडणं, अंग थरथर कापायला लागणं आणि तोंडातून फेस येणं अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसत आहेत. या नवीन आजाराने डॉक्टरही चक्रावले आहेत.
एकाचा मृत्यू
या आजाराने पीडित एक रुग्ण विजयवाडाच्या सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. या ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. चक्कर आल्यानंतर या रुग्णाला अपस्माराचा झटका (फीट येणं) आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शनिवारी एलुरुमध्ये चार वेगवेगळ्या भागांतून जवळपास ४५ रुग्णांमध्ये अजब लक्षणं आढळली होती. विशेष म्हणजे या रुग्णांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये ४६ मुलांचा तर ७० महिलांचा समावेश
आहे.
पश्‍चिम गोदावरी जिल्ह्यातील आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४० हून अधिक रुग्णांवर उपचार यशस्वी ठरल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलेय तर इतरांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवलेय.
एम्स डॉक्टरांची विशेष टीम
या आजाराची माहिती मिळताच दिल्लीतील एम्स रुग्णालयातल्या डॉक्टरांचे एक विशेष पथक एलुरूला दाखल झालंय. रुग्णांकडून विस्तृत माहिती घेत या आजाराची माहिती घेतली जातेय. स्थानिक आरोग्य आयुक्त कटमानेनी भास्कर हेदेखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एलुरूला दाखल झाले आहेत.
अहवालाची प्रतिक्षा
स्थानिक आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या लॅबमध्ये रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.सेरेब्रल-स्पायनल फ्लुएड सॅम्पल रिपोर्ट आल्यानंतर या आजाराचा खुलासा होऊ शकेल. तज्ज्ञांकडून हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण तर दुधाद्वारे केमिकल पॉयजनिंग असा अनेक अँगलने चौकशी केली जातेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here