जळगाव : प्रतिनिधी
सिटी मालेगाव क्रिकेट असोसिएशन आयोजित खुल्या टी-२० राज्यस्तरीय लेदर बाँल क्रिकेट स्पर्धेत जळगाव येथील जैन इरिगेशन संघाने अंतिम सामन्यात सीएमसीए मालेगाव संघाचा ८९ धावांनी पराभव करून विजेतेपदाची ट्रॉफी सह एक लाख अकरा हजार एकशे अकराचे पारितोषिक प्राप्त केले.
अंतिम सामन्यात फलंदाजीत ३० धावा आणि गोलंदाजीत १९ धावांत ३ गडी बाद करणारा जैन इरिगेशनचा तनिष जैन हा सामनावीराचा मानकरी ठरला. तसेच संपूर्ण स्पर्धेत एकूण पाच सामन्यात चार डावात फलंदाजीत एकूण १५७ धावा आणि अकरा बळी घेणारा तनिष जैन हा मालिकावीराचा सुध्दा मानकरी ठरला.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जैन इरीगेशन संघाने २० षटकांत ७ गडी बाद १९८ धावा केल्या. त्यात सिद्धेश देशमुखच्या सर्वाधिक ५४ धावा(४०चेंडू) होत्या. त्याखालोखाल वरून देशपांडे ३२ धावा (२० चेंडू) तनिष जैन ३० धावा (२८ चेंडू)सौरभ सिंग २५ धावा (१०चेंडू) रिषभ करवा १८ धावा (४ चेंडू नाबाद )आणि शुभम शर्माच्या ५ चेंडूतील १४ धावा होत्या.प्रत्युत्तरात सीएमसीए मालेगाव हा संघ १५.२ षटकात फक्त १०९ धावात बाद झाला.त्यांच्यातर्फे इरफान अन्सारीने सर्वाधिक ३९ धावा (३०चेंडू)व खलिद जमान ३७ धावा (२७ चेंडू)केल्या.
जैन इरिगेशन तर्फे तनिष जैन व राहुल निंभोरे यांनी प्रत्येकी १९ धावा देत तीन गडी बाद केले. रिषभ करवाने २ अमित गवानदेने १ तसेच एक फलंदाज धावबाद झाला. सामना संपल्यानंतर लगेच पारितोषिक वितरण मालेगाव शहराचे आमदार मुक्ती मोहम्मद इस्माईल कासमी, श्रीमती शानेहींद , मुस्तकींन भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.