जळगाव ः विशेष प्रतिनिधी
आपल्याकडे शासकीय,प्रशासकीय ,महापालिकास्तरीय किंवा पोलीस दलाच्या अंतर्गत कोणत्याच कामात सातत्य दिसून येत नाही.परिणामी कारवाई करून थांबविण्यात आलेले कोणतेही अवैध काम,अतिक्रमणे, वाहन धारकांचा बेशिस्तपणा या गोष्टींवर पूर्णपणे प्रतिबंध लागलेला दिसत नाही.संबंधित विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो किंबहुना कारवाईची मोहीम राबविण्यात येते तोपर्यंत सारे काही अलबेल व व्यवस्थित वाटते मात्र मोहीम थांबली किंवा कारवाई करणे थांबले की, ‘पालथ्या घड्यावर पाणी’ ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
महापालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग एखाद्या भागात कारवाई करून दुसरीकडे जाताच त्याच जागांवर अतिक्रमणे पूर्ववत दिसतात.कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्याने अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली की सारे बंद मात्र तो अधिकारी बदलून गेला किंवा त्यानेच थोडी ढिलाई केली तर पुन्हा तसेच.वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई सुरू केली की सारे वठणीवर.हेल्मेट न वापरणारांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली की,हेल्मेटची दुकाने रस्तोरस्ती लागतात आणि कारवाई थांबली की,हेल्मेट घराच्या माळोच्यावर फेकले जाते.
शहरातील ऑटोरिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस किंवा आरटीओ विभागाकडून अधून-मधून कारवाईच्या मोहीम राबविल्या जातात.त्यात रिक्षाची कागदपत्रे तपासणे,मीटर,त्यांचे ड्रेस,रिक्षेची स्थिती,बिल्ला, वाहन परवाना तपासला जातो.रिक्षांमधील आसन क्षमता तपासली जाते.शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणार्या रिक्षांची तपासणी होते .याच वेळी रिक्षांची थांब्यांचा विषय ऐरणीवर येतो.थांबे(स्टॉप)अधिकृत की अनाधिकृत हा विषय तपासला जातो. याचा अनेक
रिक्षाचालक-मालक धसका घेतात व जोवर मोहीम चालते ते आपली रिक्षा रस्त्यावर आणीत नाहीत आणि कारवाई अथवा मोहीम थांबली की, सारे पुन्हा ‘जसेच्या तसे’ हा सततचा कार्यक्रम असतो.
आजच्या परिस्थितीत शहरातून फेरफटका मारला तर सर्वात जास्त बेशिस्तपणा व मुजोरीचे प्रमाण रिक्षा चालकांचा दिसून येतो.चालक-मालक यांना कोणत्याच गणवेशाचे बंधन नाही,मुदत संपलेल्या अनेक रिक्षा रस्त्यावर धावत आहेत,अनेकांजवळ वाहनांची कागद-पत्रे नाहीत,मीटर बंद अवस्थेत,कित्येकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नाही, त्यांनी आकारलेल्या भाड्यावर बंधन वा नियंत्रण नाही,आणि रिक्षा थांब्यांवर (स्टॉप) सर्वाधिक बेशिस्तपणा दिसून येतो .कुठेही थांबा,कितीही गाड्या थांबवा ,कशाही प्रकारे गाड्या लावा,प्रवाशांशी कसेही बोला ,मुजोरी करा याला काहीच बंधने नाहीत .. त्यावरुन वाहतूक पोलिसांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत तर नाही ना,अशी प्रतिक्रिया जनतेत व्यक्त केली जात आहे.
वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभाग खरोखरीच कौतुकास पात्र ठरतो जेव्हा ते कारवाईची मोहीम चालवीत असतात पण जेव्हा ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात तेव्हा लोकांच्या चर्चेचे तेच केंद्र बनतांना दिसतात.
शहरात रिक्षाचे थांबे(स्टॉप)अधिकृत की अधिकृत हा विषय नेहमीच चर्चेचा आहे.महत्वाचे म्हणजे आमच्या माहितीनुसार येथील कोणत्याच रिक्षा थांब्यास वाहतूक पोलीस किंवा आरटीओ यांनी अधिकृत-मान्यताप्राप्त थांबा म्हणून लेखी परवानगी दिलेली नसावी असे वाटते.बहुदा जे वाहतुकीस अडचणीचे नाहीत,रस्त्याच्या एका बाजूला आहेत,ज्यांच्या बद्दल लोकांची कोणतीच तक्रार नाही ,आणि जेथील रिक्षाचालक शिस्तीत उभे असतात ते अधिकृत असावेत.आणि जे अडचणीचे ,वाहतुकीस अडथळा आणणारे सारे अनधिकृत म्हटले जात असावेत असे वाटते तरीही अधिकृत-अनधिकृत हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.कधीतरी हा विषय चर्चेत येतो तो चर्चेतच राहतो , हे विशेष.
शहरातील बहुसंख्य रिक्षाचालकांचा मुजोरपणा सध्या वाढीस लागलेला दिसतो.सारेच बेशिस्तपणे वागतात असे अजिबात नाही. काही बोटावर मोजण्याइतपत रिक्षावाले नियमांचे पालन करणारे व रस्त्याने शिस्तीत वाहतूक करणारे आहेत,त्यांचं कौतुक करावेच लागेल मात्र प्रवाशांशी उद्धटपणे बोलणे.साईडने चालणारांशी अर्वाच्चपणे बोलणे.कुठेही अचानक थांबणे -अशावेळी मागून येणारे वाहन त्या रिक्षेवर आदळते व त्यातून वाद होतात.महिला -मुलीं आजच्या स्थितीत एकट्याने रिक्षातून प्रवास करण्यास घाबरू लागल्या आहेत.कारण त्यांच्याबद्दल गंभीर अशा घटनाहीं घडलेल्या आहेत.रेल्वे स्टेशन, बसस्टँड परिसरातील रिक्षावाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाड्याची मागणी करतात,त्याबद्दल सतत तक्रारी होतात.जवळच पोलीस चौकी आहे पण त्यांचेही दुर्लक्ष.सारेच कठीण .
सद्य स्थितीत शास्त्री टॉवर चौक,साने गुरुजी चौक,घाणेकर चौक,रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड परिसर,सुभाष चौक (पोलीस चौकी जवळ),इच्छादेवी चौक,दाणा बाजार परिसर.पुष्पलता बेंडाळे चौक ,नेरी नाका परिसर,ममुराबाद नाका,शनी मंदिर -शनीपेठ आदी भागातील रिक्षाचालक आणि थांबे वाहतूक पोलिसांनी रडारवर घ्यावेत अशी मागणी आहे. आता मार्च एंडिंग म्हणून पोलिसांनी यावर कारवाई न करता कारवाईत सातत्य ठेवावे, जेणे करून बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्तीचा धडा मिळेल असेही लोकांचे म्हणणे आहे.
