जळगाव ः प्रतिनिधी
येथील निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई विसपुते यांनी स्वर्गीय सुकन्या निधीचा वाढदिवस जळगाव येथील मुलींच्या बालसुधारगृहात सामाजिक उत्तरदायित्वाने नुकताच साजरा केला.व्यवसायानिमित्ताने त्या बीडला होत्या परंतु वाढदिवसात खंड पडू नये म्हणून त्या तातडीने जळगावी परतल्या! नियतीने एकही वाढदिवस त्यांना साजरा करू दिला नाही परंतु वेदनेचा वेद करीत निरीक्षण गृहातील मुलींमध्ये स्वर्गीय निधी चिरंजीव असून तिचा आत्मा अमर आहे या विशाल मातृभावाने माता यशोदा होत त्यांनी दुःखाचा लवलेश चेहर्यावर न दाखवता मुलींमध्ये आनंदात केक कापून निधीचा उत्साहाने अखंडितपणे १६ वा वाढदिवस व्रतस्थपणे साजरा केला.
प्रारंभी स्वर्गीय सुपूत्री निधीच्या प्रतिमेचे पुजन वैशाली विसपुते यांनी सुपुत्र यशसह करुन पुष्पांजली अर्पण केली.त्यानंतर प्रमुख अतिथी प्रा. रफिक शेख,सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे,महिला व बालकल्याण सहाय्यक काऊन्सलर भारती म्हस्के व विद्या सोनार,स्मिता वेद ,सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे,शोभा हंडोरे मान्यवर उपस्थितांसह मुलींचे बालसुधार गृह जळगाव परिविक्षा अधिकारी सारिका मेटकर,अधिक्षिका जयश्री पाटील यांनी सपूजन निधीला अभिवादन केले.
प्रारंभी वाढदिवसाला प्रातिनिधिक स्वरूपात ७ बालिकांना वैशाली विसपुते यांनी औक्षण करून निरोगी दिर्घायुष्यासासह यशस्वीतेसाठी आशिर्वाद अन् शुभेच्छा दिल्या.केक कापतांना प्रा.रफिक शेख यांनी सुरेल आवाजात खास वाढदिवस गीत सादर केले त्यावेळी सर्वांनी टाळ्यांचा ठेका धरून साथ दिली.वस्तीगृहातील मुलींना कौटुंबिक अनौपचारिक आनंदाची परिपूर्ती व्हावी यासाठी सकाळपासून विसपुते परिवाराने विविध रंगी बलून्सने हॉल सुशोभनासह आनंदाने भरून गेला होता. डोक्यावर टोप्या सावरतांना सार्या मुलींचा आनंद चेहर्यावरुन ओसंडून वहात होता.
श्रीमती स्मिता वेद व नितीन सुखाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायसोनी फन स्कुलची इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी कावेरी सुरवाडकर हिने मनोवेधक नृत्यासह सुरेल बालगीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.तिला छोटी बहिण त्रिशाने सुरेख साथसंगत केली.४० विद्यार्थीनींसह उपस्थितांनी सहभोजन आनंद घेतला.प्रास्ताविक वैशाली विसपुते यांनी व सूत्रसंचालन अधिक्षिका जयश्री पाटील यांनी केले.
वैशाली विसपुते यांचे भावी संकल्प
स्त्रियांना मासिक पाळीतील अस्वच्छतेमुळे होणार्या घातक दुष्परिणामाबाबत प्रबोधन करणे, कपडेमुक्त अभियान राबवून सॅनिटरी पॅडच्या सवयी रुजविण्याबाबत ग्रामीण महिलांना शिबिरे आयोजित करून मार्गदर्शन करणे.दरवर्षी ग्रामीण भागातील एक गाव दत्तक घेऊन तरुणींसह महिलांना सॅनेटरी पॅड वर्षभर पुरविणे.
कार्यकतृत्वामुळे प्राप्त पुरस्कार
मेनका गांधी यांच्या हस्ते गौरव पुरस्कार,बिजनेस एक्सलंट अवार्ड,माहिती प्रसारण मंत्रालय भारत सरकार क्षेत्रीय लोक संघ ब्युरो तर्फे स्री शक्तीपीठ पुरस्कार,इंडियन पॉवर वुमन पुरस्कार, विरांगणा पुरस्कार,हिरकणी पुरस्कार ,सुवर्णकन्या हिरकणी पुरस्कार,सुवर्णकन्या पुरस्कार,स्वयंसिद्ध पुरस्कार,जळगाव महिला भूषण पुरस्कार,भारतीय नारी स्री सन्मान पुरस्कार,बहिणाबाई पुरस्कार,संत नरहरी महाराज पुरस्कार,नाना शंकरशेठ राष्ट्रीय पुरस्कार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कार